बिबट्याचा मुक्काम आता पाटोदा शिवारात गायीवर हल्ला चढवून मेंढीचा पाडला फडशा!

बिबट्याचा मुक्काम आता पाटोदा शिवारात गायीवर हल्ला चढवून मेंढीचा पाडला फडशा!

वाळुज /प्रतिनिधी- वाळूज महानगर परिसरातील वळदगाव पाठोपाठ आता बिबट्याने आपला मोर्चा पाटोदा-गंगापूर नेहरी शिवारात वळवून मुक्काम ठोकला. दरम्यान या बिबट्याने रविवारी 12 डिसेंबर रोजी सायंकाळी 7 वा. गायीवर हल्ला चढवून एका मेंढीचा फडशा पाडला.
    यामुळे चार मेंढपाळांनी जीवाची पर्वा न करता दोन साड्या फाडून त्या लोखंडी सळईला बांधून रात्रभर टेंभा पेटवून स्वतः सह 300 शेळ्या-मेंढ्यांचे संरक्षण केले. यावेळी बिबट्याने वाघोरीभोवती रात्रभर प्रदक्षिणा घातल्या. यामुळे मेंढपाळाचा रात्रभर थरकाप उडाला. मात्र एकतर बँटरी नाही तर नाही अन त्यातच मोबाईलमध्ये चार्जिंग नसल्याने हा रात्रीचा थरार कँमेर्यात कैद करता न आल्याच्या भावना व्यक्त मेंढपाळांनी करत असा क्षण आमच्या नशीबी प्रथम आल्याचे घाबरलेल्या आवाजात सांगितले.

पाटोदा गट क्र 94 मधील शेतकरी अशोक कचरु पेरे यांच्या शेतात गणोरी येथील मेंढपाळांनी 300 मेंढ्याचे आखार बसवले आहे. रविवारी सायंकाळी दावण्या ठोकण्यापूर्वी बिबट्याचे या मेंढपाळांना डरकाळ्या फोडून दर्शन दिले. यामुळे मेंढपाळ कचरु विठोबा सोनवणे , भगवान उमाजी सोरमारे, मच्छिंद्र एकनाथ महानोर आणि महिला मेढपाळ लताबाई कचरु सोनवणे यांची चांगलीच पाचर उडाली. या बिबट्याने कपाशीच्या शेतात दोरीने बांधलेल्या गायीवर हल्ला चढवून पंजा मारला. मात्र गाय आणि घोडीने दोरी तोडून इतरत्र पळाल्या. तर या बिबट्याने दोन पिल्लं असलेल्या एका मेंढीचा फडशा पाडला.

दरम्यान मेंढपाळांनी दोन साड्या फाडून रात्रभर जाग्रण करत आगीचा टेंभा पेटवला. यावेळी पहाटे 4 वाजेपर्यंत बिबट्याने डरकाळी फोडून वाघोरी भोवती चकरा (जाळी) मारत कपाशीतून मोसंबीच्या शेतातून उत्तर दिशेला निघून गेला.

सोमवारी सकाळी शेतकरी अशोक पेरे हे शेतात फेरफटका मारण्यासाठी आले असता, हा प्रकार लक्षात आला. तसेच या बिबट्यासोबत बछडे असल्याची माहिती परिसरातील पाऊलखुणा वरुन शेतकरी-मेंढपाळांनी दिली.

सदरची माहिती मिळताच सातारा ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेंद्र माळादे, दौलताबाद वनविभागाचे वनपाल एस टी काळे, वनरक्षक आर जस मुळे यांनी कर्मचार्यांसह धाव घेत स्वतः पाहणी करून माहिती जाणून घेतली.
यावेळी पोलीस पाटील लहु पा मुचक, उपसरपंच कपिंद्र पेरे, शिवाजी पेरे, किशोर पेरे, बबन कचरु पेरे, तंटामुक्ती अध्यक्ष विठ्ठल पेरे आदींची उपस्थिती होती.

आमच्या बातम्या WhatsApp वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा