बेरोजगार युवकांना प्रशिक्षित करून नियुक्ती पत्राचे वितरण

संभाजीनगर / प्रतिनीधी - भारतासारख्या विकसनशील देशापुढे बेरोजगारी ही खूप मोठी समस्या आहे़ त्यामूळे विविध समाजिक संस्था या तरूणांना रोजगार देण्यासाठी त्यांना प्रशिक्षित करून विविध क्षेत्रात रोजगार उपलब्ध करून देतात़ असाच एक उपक्रम जिल्हा ग्रामीण पोलीस दल व प्रथम एज्युकेशन फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आला.
या उपक्रमाअंतर्गत मोफत निवासी कौशल्य प्रशिक्षण व रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. याचा कालावधी दोन महिन्याचा असून या मेळाव्याकरिता ६१५ उमेदवारांनी नोंदणी केली होती़ त्यापैकी ८८ उमेदवारांना प्रशिक्षण देण्यात आले़ त्यामधून ७० उमेदवारांना आज दि. १८ मार्च रोजी दुपारी १२ वाजता पोलीस मुख्यालयातील सभागृहात पोलिस अधिक्षक व अप्पर पोलिस अधिक्षक यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले़ या उमेदवारांना त्यांच्या गुणवत्तेनुसार प्रस्थापित हॉटेल, कंपनी, हॉस्पिटल,रत्नप्रभा मोटर्स,ग्रीनमार्क टेक्नो,सुदर्शन सौर प्रा. लि. याठिकाणी विविध पदासाठी रोजगार उपलब्ध करून देण्यात आले आहेत. निवड झालेल्या उमेदवारात ७ मुली व ६३ मुलांचा समावेश आहे़.
याप्रसंगी बोलतांना पोलीस अधिक्षक विनयकुमार राठोड यांनी सांगीतले की, जिल्हा पोलीस दल व प्रथम एज्युकेशन फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आजतागायत ४०० तरूणांना रोजगार उपलब्ध करून देण्यात आला असून हे कार्य असेच पुढे सुरू राहणार आहे व वर्षअखेरपर्यंत १००० तरूणांना रोजगार उपलब्ध करून देण्याचे त्यांचे ध्येय आहे. ग्रामीण भागात सोयीसुविधांचा अभाव, आर्थिक परिस्थिती, कौटूंबिक जबाबदाऱ्या अशा अनेक कारणामुळे तरूणांना योग्य शिक्षण व व्यवसायाच्या संधी उपलब्ध होत नाहीत, त्यामूळे अनेकदा हे तरूण चुकीचा मार्ग निवडतात़ यासाठी जिल्हा ग्रामीण पोलीस दल व प्रथम फाउंडेशनने स्वत:चा व्यवसाय किंवा इतरही अनेक क्षेत्रात या तरूणांना संधी मिळावी या उद्देशाने या उपक्रमाची सुरूवात केली आहे़ असेही त्यांनी यावेळी सांगीतले.
यावेळी रोजगार उपलब्ध झालेल्या तरूणांनी त्यांची मते व्यक्त केली़ तसेच अप्पर पोलीस अधिक्षक अन्नपूर्णा सिंह यांनी तरूणांना मोलाचे मार्गदर्शन केले. यावेळी प्रथम कौशल्य विकास केंद्राचे राज्य समन्वयक दामोधर बुलकुंडवार, केंद्र प्रमूख जयप्रकाश शिरसाठ,प्रमोद बाकमवार,ज्योती गुजराथी यांची विशेष उपस्थिती होती. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पोलीस निरीक्षक अण्णासाहेब वाघमोडे,राखीव पोलीस निरीक्षक कोमल शिंदे, सपोनि सचिन पंडित यांनी विशेष परिश्रम घेतले़.