शासकीय कर्मचाऱ्यांसाठी लवकरच निवास्थाने उभारण्यात येणार राज्यमंत्री अब्दुल सत्तार
सिल्लोड /प्रतिनिधी - पंचायत समितीच्या आवारात नव्याने उभारण्यात येत असलेल्या पंचायत समितीच्या नवीन इमारतीची राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी रविवार ( दि.16 ) रोजी पाहणी केली. सदरील ईमारतीचे बांधकाम पूर्ण झाले असून लाईट फिटिंग आणि कलर अशा अंतर्गत कामाला सुरुवात होणार आहे. इमारतीमध्ये अत्याधुनिक सोयीसुविधा व येथील सुशोभीकरणासाठी जवळपास 12 कोटी रुपये निधी अपेक्षित असल्याने याबाबत शासनाकडे मागणी करणार असल्याचे स्पष्ट करत लवकरच या ईमारतीचे लोकार्पण करण्यात येईल असा विश्वास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी यावेळी व्यक्त केला.
शासकीय कर्मचाऱ्यांचे अपडाऊन बंद व्हावे यासाठी पंचायत समितीच्या आवारात सभापती, उपसभापती, गटविकास अधिकारी तसेच इतर सर्व कर्मचाऱ्यांसाठी शासकीय निवास्थाने उभारण्यात येणार आहे. याबाबत शासनाकडे प्रस्ताव सादर करण्यात आलेला असून सदरील प्रस्ताव मंजुरी स्तरावर आहे. मार्च महिन्यानंतर या प्रस्तावास मंजुरी मिळेल अशी अपेक्षा असून शासकीय कर्मचाऱ्यांना लवकरच मूलभूत व पायाभूत सुविधा असलेले निवास्थान उभारण्यासाठी कटिबद्ध असल्याचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले.
यावेळी जि. प.चे माजी उपाध्यक्ष केशवराव तायडे, उपनगराध्यक्ष अब्दुल समीर, जिल्हा बँकेचे उपाध्याय अर्जुन पा. गाढे, पंचायत समितीचे सभापती डॉ. संजय जामकर, उपसभापती काकासाहेब राकडे, गटविकास अधिकारी अशोक दांडगे, जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे प्रभारी कार्यकारी अभियंता कल्याण भोसले, नॅशनल सुत गिरणीचे संचालक राजेंद्र ठोंबरे, कृउबा समितीचे संचालक सतीश ताठे, नगरसेवक शंकरराव खांडवे, अकिल वसईकर, मुख्याध्यापक रामचंद्र मोरे, रवी राजपूत, रवी गायकवाड आदींची उपस्थिती होती.