भगतसिंग हाॅकर्स युनियनचे उपोषण स्थगित
औरंगाबाद /प्रतिनिधी- गेल्या 25 दिवसांपासून सुरु असणारे साखळी उपोषण व कॅनॉट प्लेस ते मनपा पदयाञेनंतर मनपा उपायुक्त रवींद्र निकम यांनी लेखी आश्वासन दिले. त्यामुळे शहीद भगतसिंग हाॅकर्स युनियन संलग्न आयटक व नॅशनल हाॅकर्स फेडरेशन चे साखळी उपोषण स्थगित करण्यात आले. लेखी आश्वासनाप्रमाणे पुढील आठवड्यात तारकुंपण न काढल्यास पुन्हा तीव्र आंदोलन करण्यात येईल असाही इशारा शहीद भगतसिंग हाॅकर्स युनियन ने दिला आहे .
याबाबत असे की , मनपा औरंगाबाद वर पथविक्रेता उपजीविका संरक्षण व विनिमयन कायदा 2014 च्या अंमलबजावणीची जबाबदारी असताना मनपाचेच अधिकारी त्याचे उल्लंघन करतात असे दिसून येत आहे. सिडको कॅनॉट प्लेस जी एस टी ऑफिस फुटपाथवरील बेकायदेशीर तारकुंपण काढा या मागणीसाठी गेल्या 25 दिवसांपासून मनपा कार्यालय टाऊन हॉल समोर शहीद भगतसिंग हाॅकर्स युनियन संलग्न आयटक तर्फे गेल्या 25 दिवसांपासून साखळी उपोषण सुरू होते. याकडे मनपा प्रशासन दुर्लक्ष करीत होते. याविरोधात नाईलाजास्तव कॅनाॅट प्लेस, सेंट्रल नाका, कटकट गेट, चंपा चौक, सिटी चौक मार्गे मनपा टाऊन हॉल कार्यालय अशी पदयाञा काढण्यात आली होती. याकडेही दुर्लक्ष केल्यास मनपा कार्यालय टाऊन हॉल समोर हातगाड्या लावुन फळविक्री करुत असा इशाराच युनियन ने दिला होता.
सिडको कॅनॉट प्लेस येथील जीएसटी ऑफीसच्या कॉर्नरवरील फुटपाथवर बेकायदेशीररित्या तारकुंपण लावण्यात आले आहे. त्याठिकाणी गेल्या 8-10 वर्षांपासुन असंख्य पथविक्रेते व्यवसाय करतात. सदरील फळविक्रेते हे कचरा करतात, असा राग मनात धरून पोलीस व मनपा अधिकार्यांनी हातगाडीवाल्यांना उभे राहता येऊ नये म्हणून फुटपाथवरच तार कुंपण लाऊन टाकले. असे फुटपाथवर तारकुंपण लावता येत नाही. त्यासाठी जनतेच्या पैशाची उधळपट्टीही केली. स्मार्ट सिटी च्या नावाखाली पथविक्रेत्यांना बेरोजगार करणे व गरीबांना त्रास देणे, छोटा रोड अधिक छोटा करणे यास शहिद भगतसिंग हॉकर्स युनियनचा व शहरातील नागरिकांचा सक्त विरोध आहे. शहरातील मनपाच्या शाळांचा दर्जा सुधारण्यासाठी तसेच शहरातील बेरोजगारी दूर होऊन प्रत्येकाला पोटभर अन्न मिळणे, हेच शहराच्या स्मार्ट असण्याचे लक्षण आहे. ते न करता श्रमीकांना शहराची घाण समजणे म्हणजेच उपाशी माणसाच्या तोंडाला पावडर फासून मेकअप करण्यासारखे आहे. स्मार्ट सिटी साठी आलेला पैसा गरीबांना हाकलण्यासाठी वापरू नका. स्मार्टसिटी कशी असावी, हे ठरविण्याचा अधिकार हा त्या-त्या शहरातील नागरिकांचा आहे. पथविक्रेते हे या शहराचे नागरिक आहेत. कोण्यातरी पुढार्याच्या इच्छेखातर गरिबांना त्रास देणे व कायद्याचे उलंघन करणे बंद करावे, अशी पुन्हा एकदा न्रम्र विनंती करण्यात आली आहे. शहर पथविक्रेता समितीचे अध्यक्ष म्हणून सदर कायद्याचे पालन करण्याची व करुन घेण्याची जबाबदारी मनपा आयुक्त यांची आहे. मनपा आयुक्त आस्तिक कुमार पाण्डेय हे बाहेर गावी असल्याने ते आल्यावर प्रश्न सोडवु असे आश्वासन त्यावेळेचे प्रभारी आयुक्त भालचंद्र नेमाणे यांनी दिले होते. आस्तिक कुमार पाण्डेय येऊन अनेक दिवस झालेत तरी अजुनही तारकुंपण काढण्यात आलेले नाही. आज मनपा उपायुक्त रवींद्र निकम व अतिरिक्त आयुक्त सौरभ जोशी यांनी ॲड. अभय टाकसाळ यांच्या सोबत तारकुंपण लावलेल्या सिडको कॅनॉट प्लेस येथील हाॅकर्स पाॅईंटवर पाहणी केली. पुढील आठवडय़ात मनपा आयुक्त आस्तिक कुमार पाण्डेय यांच्यासोबत बैठक बोलावून हा प्रश्न सोडवण्यात येईल असे लेखी आश्वासन दिल्यानंतर त्यांच्या विनंति वरुन साखळी उपोषण स्थगित करण्यात आले . दिलेला शब्द न पाळल्यास पुन्हा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही शहीद भगतसिंग हाॅकर्स युनियन संलग्न ने दिला . यावेळेस अॅड. अभय टाकसाळ, अध्यक्ष (शहीद भगतसिंग हॉकर्स युनियन)शेख इसाक, राजु हिवराळे,
शाहबाज अहेमद,अजाज बागवान,पाशा पटेल, मेहमूद पठाण, रमेश पुरी, अतिक बागवान, भगवान सरकटे, भाऊसाहेब गायकवाड इ उपस्थित होते.