धोकादायक क्रांतीचौक उड्डाण पूलाबदद्दल भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा आंदोलनाचा इशारा
औरंगाबाद / प्रतिनिधी- औरंगाबादची जीवन वाहीनी असणाऱ्या जालना रोडचा छोट्या छोट्या आणि चुकीच्या उड्डाणपूलामूळे बट्ट्याबोळ झाला आणि फक्त 10 वर्षांत क्रांतीचौक उड्डाण पूलावर भगदाड पडले याचा निषेध करत तातडीने स्ट्रक्चरल ऑडिट करुन संभाव्य जीवीत हानी रोखण्याची मागणी भारतीय कम्युनिस्ट पक्षाने महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे अधिक्षक अभियंता बी पी साळुंके यांना केली.
याबाबत असे की, क्रांतीचौक उड्डाण पूलावर मोठे भगदाड पडल्याने संभाव्य जीवीत हानी रोखणेबाबत व त्यासाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षाने पुढाकार घेत उपाय योजना करीत सदरील नुकसानीची जबाबदारी निश्चित करून योग्य ती कारवाई करणे बाबत महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे अधिक्षक अभियंता साळुंके यांना निवेदन देऊन सविस्तर चर्चा केली. यावेळेस कार्यकारी अभियंता सुरेश अभंग, उप अभियंता सुरेश इंगळे हे देखील उपस्थित होते.
निवेदनात क्रांतीचौक उड्डाण पूलावर मोठे भगदाड पडले आहे, याच्या बातम्या वर्तमानपत्रातून व इलेक्ट्रॉनिक मीडियातुनही आल्या आहेत, १० वर्षापुर्वी बांधलेला हा उड्डाणपूल सुरुवातीपासून वादग्रस्त ठरला. अगदी पहिल्याच आठवडयात या उड्डाणपूलाने दोन बळी घेतले होते. चुकीचे आणि छोटे-छोटे उड्डाणपूल बांधून औरंगाबादची जीवनवाहिनी असणार्या जालना रोडचा बट्ट्याबोळ करण्यात आला आहे.
सुरवातीलाच बाबा पेट्रोलपंप ते केब्रीज स्कूल एक खांबी उड्डाण पूल बांधायला हवा होता. छोटे-छोटे उड्डाण पूल बांधुन खालचीही जागा गेली. वरती जाऊन उपयोग नाही, अशी सी-सॉ करण्यात आली. जनतेचा पैसा वाया घालवला. आता अखंड उड्डाणपूलाची नुसती चर्चा करून औरंगाबादकरांना चॉकलेट दिले जात आहे. अखंड उड्डाणपूल करणार तर मग जिल्हा न्यायालय व चिकलठाण्याला लाखो रुपये खर्चून स्कायवॉक कशाला बांधला, असा प्रश्न निर्माण होत आहे.
पेट्रोलच्या किमती १०० पार झालेल्या असताना औरंगाबादकरांना र्भूदंड म्हणून अमरप्रित चौक आणि आकाशवाणी येथे बँरीगेट लावून काल्डा कॉर्नरकडे तसेच आकाशवाणीकडून जवाहरनगरकडे जाणार्यांना लांब वळसा घालून यावे लागते. त्यामुळे पेट्रोल जास्तीचे लागते. प्रशासन स्वतःचा त्रास वाचविण्यासाठी नागरिकांच्या खिश्याला व वेळेला झळ पोहचवत आहे. राजकारण्यांच्या दबावाखाली न येता वेळीच आपल्या खात्याने एकखांबी अखंड उड्डाणपूलाशिवाय तांत्रिकदृष्ट्या सध्याच्या चूकीच्या छोट्या-छोट्या उड्डाणपूलासाठी होकार दिला नसता तर आजची बिकट परिस्थिती निर्माण झाली नसती. कोणत्याही शहराच्या विकासकामाचा विचार करताना त्या शहराच्या १०० वर्षानंतरच्या लोकसंख्येला उपयोगी ठरेल असे इन्फ्रास्टक्चर निर्माण करायचे असते. इथे १० वर्षापूर्वीच्या बांधकामांना आजच घर-घर लागली आणि ते सध्याच्या लोकसंख्येच्या पासंगालाही पूरत नाहीत. या बेजबाबदार दृष्टीकोनामुळे औरंगाबाद शहर नावाचे खेडेगाव करण्यात करण्यात आले असल्याचा आरोपही भारतीय कम्युनिस्ट पक्षाने निवेदनात केला.
क्रांतीचौक उड्डाण पूलावर पडलेल्या भगदाडाने औरंगाबादकरांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. त्याचे तत्काल स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात यावे. जोपर्यंत हा उड्डाण पूल सुरक्षित होत नाही तोपर्यंत यावरील रहदारी बंद केली पाहीजे. आपण दुर्लक्ष केल्यास होणार्या दुर्घटनेस आपण जबाबदार असाल असेही म्हटले आहे.
क्रांतीचौक उड्डाणपूलासह सर्वच उड्डाणपूलांचे तत्काल स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात यावे. जोपर्यंत हा उड्डाण पूल सुरक्षित होत नाही तोपर्यंत यावरील रहदारी बंद केली पाहीजे. आपण दुर्लक्ष केल्यास होणार्या दुर्घटनेस आपण जबाबदार असाल व त्या विरोधात भारतीय कम्युनिस्ट पक्ष तीव्र आंदोलन करेल, असा इशाराही या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. पाच वर्षापुर्वी हा उड्डाण पूल सार्वजनिक बांधकाम विभाग ( राष्ट्रीय महामार्ग) यांना रस्ते विकास महामंडळाने हस्तांतरित केला असल्याची माहीति साळुंके व अभंग यांनी दिली. यावेळेस शिष्टमंडळात भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सहसचिव ॲड. अभय टाकसाळ, विकास गायकवाड, राजेश हिवराळे, माधुरी जमधडे हे होते.