मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात ठाणे न्यायालयात तक्रार दाखल
मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मंत्रालयामधील कार्यालयात धार्मिकविधी केल्याप्रकरणी ठाण्यातील रहिवासी धनाजी सुरोसे यांनी त्यांच्याविरोधात ठाणे न्यायालयात तक्रार दाखल केली. या तक्रारीवर सोमवारी सुनावणी होणार आहे.
तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाचा पदभार स्विकारल्यानंतर ७ जुलैला मंत्रालयामधील कार्यालयात सत्यनारायण कथा, पूजन केले. हे कृत्य राज्यघटनेच्या विरुद्ध आहे. मुख्यमंत्र्यांच्या कर्तव्यामध्ये शासकीय कार्यालयात धार्मिक पूजा करता येत नाही. शासकीय नियम आणि अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याचेही यामध्ये उल्लंघन आहे. असे सुरोसे यांनी तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी त्यांनी ठाणे न्यायालयात धाव घेतली. त्यानुसार सोमवारी तक्रारीवर सुनावणी होणार आहे.