पहाटे मोबाईल शाॅपीवर डल्ला पाच लाखांचा ऐवज लंपास
चोरीचा प्रकार सीसीटीव्हीत कैद
औरंगाबाद / प्रतिनिधी - वाळूज औद्योगिक वसाहतीमध्ये भर चौकातील मोबाईल शाॅपीचे शटर उचकटून चोरट्यांनी रोख रक्कम, मोबाईल, संगणक आणि मोबाईलच्या पार्टसह पाच लाखांचे मोबाईल लंपास केल्याची घटना वाळूज एमआयडीसीतील महाराणा प्रतापचौकात शुक्रवारी (१५ मार्च) रोजी सकाळी उघडकीस आली. चोरीच्या घटनेचा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला असून हाकेच्या अंतरावर असलेल्या पोलिस ठाण्यात घटनेची माहिती दिल्यानंतर दोन तास उलटून गेल्यावरही पोलिसांनी दखल घेतली नाही, ११२ ला काॅल केल्यानंतर सुमारे अर्ध्या तासानंतर पोलिस आल्याची माहिती सदगुरू मोबाईल शाॅपीच्या मालकांनी दिली.
वाळूज एमआयडीसी परिसरातील महाराणा प्रतापचौक भागात मुख्य रस्त्यालगत सुनिल जग्गनाथ जाधव (वय.३५ रा,कांचनवाडी) यांचे सदगुरू मोबाईल शाॅपी नावाचे दुकान आहे. गुरूवारी भीमजंयतीमुळे जाधव हे दुपारी दीडच्या सुमारास दुकान बंद करून घरी गेले. शुक्रवारी सकाळी सातच्या सुमारास जाधव हे दुकानकडे गेले. त्यावेळी दुकानाचे शटर उचकटले असल्याचे जाधव यांच्या निदर्शनास आले. दरम्यान चोरट्यांनी जाधव यांच्या दुकानातून २४ हजार पाचशेच्या रोख रक्कमसह ३७ हजार दोनशे रूपये किंमतीचे ३२ नविन मोबाईल तसेच दुरूस्तीसाठी आलेले दोन लाख २२ हजार रुपयांच्या मोबाईलसह संगणक आणि मोबाईलचे साहित्य असे एकुण पाच लाख १६ हजारांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केल्याची तक्रार जाधव यांनी एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात दिली आहे. दरम्यान ही घटना सीसीटीव्हीत कैद झाल्याने जाधव यांनी त्यांचे तळमजल्यावरील दुकानातील सीसीटीव्ही फुटेज चेक केले. त्यावेळी दोन चोरटे मोबाईल लंपास करत असल्याचे दिसून आले. या घटनेची माहिती जाधव यांनी वाळूज एमआयडीसी पोलिसांना दिली. मात्र हाकेच्या अंतरावर पोलिस ठाणे असूनही सुमारे दोन तास उलटून गेल्यानंतरही पोलिस आले नाही. त्यामुळे जाधव यांनी ११२ वर काॅल करून चोरीच्या घटनेची माहिती दिली. माहिती मिळाल्यानंतर सुमारे आर्ध्या तासांनी पोलिस आले. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केल्याची माहिती दुकानाचे मालक सुनिल जाधव यांनी दिली. याप्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चोराची हिम्मत वाढली ; लुटमारीच्या घटना वाढल्या....
वाळुज एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्या काही महिन्यापासून चोरीचा आणि लुटमारीच्या घटना मोठी वाढ झाल्याचे दिसून येते. चोरी झाल्यानंतर चोरांना जेरबंद करण्यात पोलीस प्रशासन कुठेतरी कमी पडत असल्याने परिसरात चोरी करणाऱ्या चोरट्यांची हिम्मत वाढल्याची चर्चा नागरिकांमध्ये होत आहे. गेल्या काही महिन्यात झालेल्या चोरीच्या घटनातील आरोपी मोकाट फिरत असल्याने दिवसेंदिवस चोरांची हिंमत वाढत आहे. याकडे पोलीस प्रशासनातील वरिष्ठांनी लक्ष देऊन चोरांचा मुसक्या आवळा असे चर्चा नागरिकांमध्ये दबक्या आवाजात होत आहे.