विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदावरून काँग्रेसमध्ये नाराजी; अशोक चव्हाण म्हणाले, न विचारताच निर्णय घेतला
मुंबई : एकीकडे भाजपा आणि शिवसेनेतील बंडखोर शिंदे गटाच्या सरकारचा मंत्रीमंडळ विस्तार झाल्यानंतर मंत्रिपदासाठी इच्छुक असणाऱ्या अनेकांमध्ये नाराजी आहे. दुसरीकडे विरोधी पक्षातील महाविकासआघाडीतही नाराजीनाट्य सुरू आहे. त्यांच्यातील नाराजीचा मुद्दा विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेपद हा आहे. विधान परिषदेतील सभागृह नेतेपद शिवसेनेला देण्याचा निर्णय झाल्याने काँग्रेसमध्ये नाराजी आहे. यावर काँग्रेस आमदार अशोक चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते बुधवारी (१० ऑगस्ट) माध्यमांशी बोलत होते.
अशोक चव्हाण म्हणाले, “काँग्रेस पक्षाला विधान परिषदेत सभागृह नेतेपदाचं, विरोधी पक्षनेतेपदाचं स्थान मिळालयला हवं होतं. मात्र, चर्चा न होताच परस्पर हा निर्णय झाला आहे. त्यामुळे स्वाभाविकपणे काँग्रेसमध्ये याची प्रतिक्रिया आहे.”
“मंत्रीमंडळ कुणाचंही असो, महिलांना प्रतिनिधित्व गरजेचं”
चव्हाण यांनी यावेळी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये महिलांना संधी न दिल्याच्या मुद्द्यावरही भाष्य केलं. ते म्हणाले, “मंत्रीमंडळ कुणाचंही असो, महिलांना सक्षम करणं, प्रतिनिधित्व देणं गरजेचं आहे.”
संजय राठोडांना मंत्रीमंडळात घेण्यावरूनही चव्हांना प्रश्न विचारण्यात आला. “मंत्रीमंडळात कुणाला घ्यायचं आणि कुणाला घ्यायचं नाही हा सर्वस्व निर्णय मुख्यमंत्र्यांचा आहे. हे दोन पक्षाचं सरकार असल्यामुळे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीच यावर अधिक स्पष्टीकरण देऊ शकतील. भाजपामधीलच काही लोकांनी त्यांच्या नावावर आक्षेप घेतला आहे. त्यावर अधिक स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देऊ शकतील,” असं मत चव्हाणांनी व्यक्त केलं.