निवडणुकीच्या याचिकेवर नाताळच्या सुटीनंतर सुनावणी
औरंगाबाद /प्रतिनिधी - औरंगाबाद महानगरपालिका निवडणुकीच्या प्रभागरचनेसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या याचिकेवर आज सरन्यायाधीश रामण्णा, न्या. सूर्या कांत व न्या. हिमा कोहली यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. सुनावणीअंती सर्वोच्च न्यायालयाने याचिकेची पुढील सुनावणी नाताळच्या सुट्टीनंतर तहकूब केली आहे.
सुनावणी दरम्यान राज्य निवडणूक आयोगाच्या वतीने असे प्रतिपादन करण्यात आले की, पूर्वी एक सदस्यीय प्रभाग रचना होती. मात्र राज्य शासनाने अध्यादेश काढून आता बहुसदस्यीय प्रभागरचना केली असून प्रभागरचनेची व आरक्षणाची संपूर्ण प्रक्रिया नव्याने करणे आवश्यक आहे. त्यामुळे याचिका निरस्त झाली असून ती फेटाळण्यात यावी.
याचिकाकर्ते श्री समीर राजूरकर यांच्या तर्फे अशी विनंती करण्यात आली की नव्याने प्रभागरचना व आरक्षणाची प्रक्रिया राबविण्यास याचिकाकर्त्याचा आक्षेप नाही. मात्र यापूर्वी प्रभागरचना तसेच आरक्षणाची प्रक्रिया राबवितांना कायदेशीर तरतुदींचा व गोपनीयता पाळण्यासंदर्भात दिलेल्या आदेशांचा भंग झाला आहे. त्यामुळे याचिका निरस्त म्हणून निकाली न काढता नव्याने राबवण्यात येणाऱ्या प्रभाग रचना व आरक्षणाच्या प्रक्रियेदरम्यान कायदेशीर तरतुदींचे तसेच नियमांचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश राज्य निवडणूक आयोगास देण्यात यावे.
सुनावणीअंती सर्वोच्च न्यायालयाने याचिकेची पुढील सुनावणी नाताळच्या तहकूब केली आहे.आता सदर सुनावणी जानेवारी महिन्यामध्ये होण्याची शक्यता आहे. सदर प्रकरणात राज्य निवडणूक आयोगाच्या वतीने अॕड. अजित कडेठाणकर तर समीर राजूरकर यांच्या वतीने अॕड देवदत्त पालोदकर व अॕड शशिभूषण आडगावकर काम पाहत आहेत.