अफगाणिस्तान आणि जागतिक शांतता' या विषयावर तज्ञांचे वेबिनार
औरंगाबाद/प्रतिनिधी - एमजीएम विद्यापीठाचे गांधीयन स्टडीज विभाग आणि सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठाण वर्धा आणि केरळ केंद्रीय विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने जागतिक शांतता दिनाच्या निमित्ताने 'अफगाणिस्तान आणि जागतिक शांतता' या विषयाव<span;>र<span;> वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते
गरिबी, बेरोजगारी, मानवाधिकार,अराजकता, सीमावाद, धर्मवाद अशा अनेक समस्या जगात सध्याच्या काळात आहेत. या समस्यांवर मार्ग निघणे खूप गरजेचे आहे. युद्ध करणे सोपे असते पण शांततेचे कार्य कठिण असून जगाला त्याची गरज आहे, असा सूर जागतिक शांतता दिनानिमित्त आयोजित वेबिनारमध्ये देश-विदेशातील तज्ञांनी व्यक्त केला.
या वेबिनारमध्ये ज्येष्ठ गांधी अभ्यासक आणि एमजीएम विद्यापीठातील एमिनंट प्रोफेसर डॉ. मार्क लिंडले, केरळ केंद्रीय विद्यापीठाच्या गांधीयन स्टडीज विभागाचे प्रा.डॉ. मुलाकट्टू जॉन, एमजीएम गांधीयन स्टडीज विभागाचे प्रा.डॉ. जॉन चेल्लादुराई तसेच कर्नाटकातील शिक्षण, पर्यावरण आणि समाज विभागाचे कार्यकारी संचालक डॉ. बी.के.हरीश कुमार यांचा सहभाग होता. तर एमजीएम विद्यापीठातील सामाजिक शास्त्र विभागाच्या अधिष्ठाता डॉ. रेखा शेळके यांच्यासह देशविदेशातील तज्ञ आणि अभ्यासकांची उपस्थिती होती.
प्रास्ताविकात डॉ. जॉन चेल्लदुराई म्हणाले, जगाला गांधीजीचे वास्तववादी चिरंतन शांततेचे मर्म अद्याप कळालेले नाही. सर्वोदय, सर्वेशी अर्थकारणाची बापूंची संकल्पना होती. पण, गरीबी, बेरोजगारीचे वाढते प्रमाण संघर्ष निर्माण करत आहे. गांधी विचार, शांततावादी मार्ग अनेक समस्यांमधून मार्ग काढू शकते. त्यासाठी आपण सदैव प्रयत्नरत असायला हवे.
'प्रॉस्पेक्ट ऑफ पीस- इन कन्टेक्स्ट ऑफ तालिबान-अफगाणिस्तान' या विषयावर प्रा.डॉ. मुलाकट्टू जॉन म्हणाले, शांततेसाठी काम करणे कठिण आहे. युद्ध हे खूप सोपे आहे. जेव्हा स्वत:वर अन्याय झाला असे लोकांना वाटू लागते, तेव्हा हिंसेचा मार्ग धरला जातो. पहिल्या तालिबान कार्यकाळापेक्षा सध्याचे अफगाणिस्तान बरेच आधुनिक आहे. महत्वकांक्षी युवकांची संख्या येथे मोठी आहे. सर्वसमावेशक सरकार स्थापन करू, असे तालिबानी सातत्याने सांगत असले तरी त्यात मोठा विरोधाभास आहे. तेथील जनताच संभ्रमावस्थेत आहे. अफगानातील ग्रामीण जनता शहरीपेक्षा मोठ्या प्रमाणात धर्मवादी आहे. त्यामुळे त्यांच्यावर प्रभाव टाकण्याचा तालिबान्यांचा सदैव प्रयत्न राहीला आहे. आता स्थानिक संस्कृतीचा विचार करून तेथील संघर्ष दूर करण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. आंतरराष्ट्रीय समुदायाने अफगानातील संसाधनाच्या उपयोगाबाबत पुढाकार घ्यावा, अशी भावनाही डॉ. जॉन यांनी व्यक्त केली.
'अफगान वार अँड एपिसोड इन द कल्चरल हिस्टरी ऑफ यूएसए-इन द कॉन्टेक्स्ट ऑफ पीस' या विषयाच्या अनुषंगाने प्रा.डॉ. मार्क लिंडले म्हणाले, व्हिएतनाम युद्धापूर्वी अमेरिका हे जगाच्या पाठीवर अत्यंत समृद्ध राष्ट्र होते. जपान युद्धानंतर अमेरिका सांस्कृतिक तणावात होते आणि त्यानंतर संपूर्ण समृद्धतेवर निरंकुशता आली. अफगाणिस्तानच्या स्थितीमुळे जगासमोर मानवाधिकाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यातून मार्ग काढण्यासाठी शांतता हाच महत्वाचा पर्याय आहे, अशी भावनाही मार्क लिंडले यांनी व्यक्त केली. या वेळी सहभागींनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देताना तज्ञांनी शांततेचा सल्ला दिला. सिबी जोसेफ यांनी सुत्रसंचलन केले.