सात मजली इमारतीला भीषण आग
ढाका : बांगलादेशच्या राजधानीत गुरुवारी रात्री मोठी दुर्घटना घडलीये. इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील एका रेस्टॉरंटमध्ये गुरुवारी रात्री 9:50 च्या सुमारास आग लागली आणि ही आग त्वरीत वरच्या मजल्यापर्यंत पसरली.
या आगीत 44 जणांचा मृत्यू झाला, तर 22 जण जखमी झाले आहेत. आरोग्य मंत्री डॉ. सामंत लाल सेन यांनी ही माहिती दिली आहे.
आरोग्य मंत्री डॉ. सेन यांनी ढाका इथं पहाटे 2 वाजता भेट देत दुर्घटनेची माहिती जाणून घेतली. बांगलादेश अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील एका रेस्टॉरंटमध्ये गुरुवारी रात्री 9:50 च्या सुमारास आग लागली आणि ही आग त्वरीत वरच्या मजल्यापर्यंत पसरली. यामध्ये रेस्टॉरंटसह कपड्यांचं मोठं नुकसान झालं आहे.
सात मजली इमारतीतून 75 लोकांना बाहेर काढण्यात आलं, त्यापैकी 42 लोक बेशुद्ध आहेत. अग्निशमन दलाच्या 13 तुकड्या तैनात करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. आरोग्य मंत्री सेन म्हणाले, 'ढाका मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये (डीएमसीएच) 33 जणांचा मृत्यू झाला. तर, शेख हसीना नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ बर्न अँड प्लास्टिक सर्जरीमध्ये 10 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या दोन्ही हॉस्पिटलमध्ये 22 जणांवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे त्यांनी सांगितले.