ओंकार विद्यालयाला श्रद्धेय दत्ताजी डिडोळकर शिक्षण पुरस्कार
छत्रपती संभाजीनगर - शिक्षण व समाजसेवा कार्यात उल्लेखनीय योगदान देत असल्याबद्दल ओंकार विद्यालयाला सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या हस्ते 'श्रद्धेय दत्ताजी डिडोळकर शिक्षण पुरस्काराने' सन्मानित करण्यात आले. एक लाख रुपये रोख आणि स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे संस्थापक श्रद्धेय दत्ताजी डिडोळकर यांच्या जन्मशताब्दी वर्षाचा समारोप कार्यक्रम बुधवारी (दि. 7) नागपूर येथील कवी सुरेश भट सभागृहात पार पडला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मा. डॉ. मोहनजी भागवत, जन्मशताब्दी समारोह समितीचे अध्यक्ष केंद्रीय मंत्री मा. श्री. नितीन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत श्रद्धेय दत्ताजी डिडोळकर शिक्षण पुरस्कार देऊन ओंकार विद्यालयाला सन्मानित करण्यात आले. एक लाख रुपये रोख आणि स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजीव सावजी यांचा यावेळी डॉ. मोहनजी भागवत यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. यावेळी संस्थेच्या वतीने डॉ. मधुश्री सावजी, सचिव हरीश जाखेटे, सहसचिव प्रचिती अभ्यंकर, कोषाध्यक्ष श्रीकांत दरख, अर्चना नरसापूर, मुख्याध्यापक सुजाता भाले यांची उपस्थिती होती.
ओंकार विद्यालय ही मागील १४ वर्षांपासून विद्यार्थ्यांच्या हितासाठी झटणारी मराठी व सेमी मराठी माध्यमाची शाळा आहे. फक्त पुस्तकी ज्ञान न देता पंचकोश विकासातून अनुभवजन्य शिक्षण देणारी शाळा अशी हिची ख्याती आहे.
याच शाळेत मराठवाड्यातील पहिली अद्ययावत विज्ञान प्रयोगशाळा 'वराहमिहीर विज्ञान केंद्र' या नावाने सुरू आहे. या केंद्रातर्फे दरवर्षी होमी भाभा परिक्षेच्या दुसऱ्या टप्प्यातील प्रात्यक्षिक परिक्षेची तयारी करुन घेतली जाते. याचा फायदा घेण्यासाठी दुरून दुरून विद्यार्थी येतात. संस्थेच्या अशा अनेक कामांची दखल घेऊन या पुरस्कारासाठी संस्थेची निवड करण्यात आली.
या कार्यक्रमाला अंजनगाव सुर्जी येथील देवनाथ मठाचे स्वामी श्रीजितेंद्रनाथ महाराज, अभाविप अखिल भारतीय संघटनमंत्री आशिष चव्हाण, लेखक अरुण करमरकर, समितीचे सचिव अजय संचेती, संयोजक भुपेंद्र शहाणे यांची मंचावर उपस्थिती होती. या कार्यक्रमाला विदर्भातील नागरिक, शिक्षण क्षेत्रातील मान्यवर, विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी समितीचे उपाध्यक्ष अरुण लखानी, प्रा. अनिरुद्ध देशपांडे, प्रा. बाळ दीक्षित, संयोजक भूपेन्द्र शहाणे, सहसंयोजक डॉ. रविशंकर मोर, सदस्य डॉ. विलास डांगरे, डॉ. रामदास आंबटकर, डॉ. उपेंद्र कोठेकर, प्रा. अनिल सोले, सुनील पाळधीकर, प्रा. नारायण मेहरे, डॉ. मुरलीधर चांदेकर, विनय माहुरकर, जयंत पाठक आदींचे सहकार्य लाभले