काळबादेवीत इमारत कोसळल्याची घटना
मुंबई / प्रतिनिधी - राज्याची राजधानी असलेल्या मुंबई शहरात एक अनपेक्षित घटना समोर आली आहे. मुंबईच्या काळबादेवीत इमारत कोसळल्याची दुर्घटना घडली आहे. या घटनेचे लाईव्ह दृश्य कॅमेऱ्यात जसेच्या तसे कैद झाले आहेत. घटनेचा व्हिडीओ हा अतिशय भीतीदायक असाच आहे. सर्वसामान्यपणे रस्त्यावर वर्दळ होती आणि अचानक इमारत कोसळते.
दुर्घटनेत किती नुकसान झालंय याबाबतची माहिती अद्याप समोर आलेली नाही. घटनेत जीवितहानी झालीय का याबाबतची माहिती अद्याप समजू शकलेली नाही. काळबादेवीत जी इमारत कोसळली ती चार मजली इमारत होती.
मुंबईत कालपासून पावसाने जोर धरला आहे. त्यानंतर आता इमारत कोसळण्याच्या घटना घडू लागल्या आहेत. मुंबईच्या कुर्ला परिसरात काल नुकतीच इमारतीचा एक भाग कोसळल्याची बातमी समोर आली होती. त्यानंतर आता काळबादेवी परिसरात चार मजली इमारतीचा काही भाग कोसळल्याची माहिती समोर आली आहे.
या दुर्घटनेमध्ये किती नागरीक जखमी झाले आहेत याबाबतची माहिती अद्याप समजू शकलेली नाही. अग्निशमन दल आणि प्रशासनाचे इतर अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. त्यांच्याकडून ढिगारा उचलण्याचं काम सुरु झालं आहे. काळबादेवीतील बादामवाडी परिसरात संबंधित दुर्घटना घडली आहे.
ही दुर्घटना लेव्हल 1 ची असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. मुंबई महापालिकेने जाहीर केलेल्या धोकादायक इमारतींच्या यादीतील संबंधित इमारत होती. अद्यापपर्यंत जीवितहानीची अधिकृत माहिती मिळालेली नाही. एनडीआरएफचे पथकही घटनास्थळी दाखल झालं आहे. प्रशासनाकडून बचावाचे शर्थीने प्रयत्न सुरु आहेत.