सिद्धार्थ उद्यानात बसविणार सोलार पॅनल

सिद्धार्थ उद्यानात बसविणार  सोलार पॅनल

संभाजीनगर /प्रतिनिधी - महापालिका सिद्धार्थ उद्यानात सौर पॅनल बसविणार असल्याची माहिती नुकताच समोर आली याचा मुख्य उद्देश म्हणजे
सिद्धार्थ उद्यानासाठी सध्या सुमारे वर्षाकाठी २४ लाख रुपये बिल येत असून, सौरऊर्जेचा वापर सुरू झाल्यानंतर हे बिल वाचणार असल्याचे सांगितले जात आहे.

महापालिकेचे स्मार्ट सिटी अभियानाअंतर्गत मुख्यालयातील टप्पा क्रमांक तीनच्या छतावर पॅनल बसविले आहेत. त्यातून वीजबिलात मोठी बचत झाली. त्यानंतर स्मार्ट सिटी कार्यालयासाठीदेखील सौरऊर्जेचा वापर करण्यात येत आहे. त्यासोबतच आता महापालिकेच्या सर्व शाळा, सिद्धार्थ उद्यान तसेच पाणीपुरवठा योजनेचे बिल कमी करण्यासाठी महापालिकेने प्रयत्न सुरू केले आहेत.

उद्यान विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, महापालिकेला सिद्धार्थ उद्यानाचे दर महिन्याला दीड ते दोन लाख रुपये वीजबिल भरावे लागते. उन्हाळ्यात दोन लाखांपर्यंत बिल येते. हिवाळ्यात दीड ते पावणेदोन लाखापर्यंत बिल येते. सोलार यंत्रणा उभारून उद्यान, प्राणिसंग्रहालय आणि पोहण्याचा तलाव विजेच्या बाबतीत आत्मनिर्भर करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. त्यासाठी ठराव मंजूर करण्यात आला आहे.

या ठरावात नमूद करण्यात आले आहे, की सिद्धार्थ उद्यानाच्या पब्लिक पार्किंगच्या छतावर सोलार यंत्रणा बसविण्यात येईल. महाऊर्जा विकास प्राधिकरणाने (एमईडीए) उद्यानासाठी स्वतंत्र २०० किलोवॉटचा ट्रान्सफॉर्मर व त्यासाठी अनुषंगिक कामाचा समावेश करण्यासाठी केलेल्या सूचनेनुसार, अंदाजपत्रक महापालिकेने तयार केले आहे.

छतावर बसविण्यात येणाऱ्या सोलार पॅनलच्या माध्यमातून दररोज चारशे युनिट वीजनिर्मिती होणार आहे. निर्माण होणारी वीज उद्यान, प्राणिसंग्रहालय आणि पोहण्याच्या तलावासाठी वापरण्यात येणार असून, शिल्लक राहणारी वीज महावितरण कंपनीला विकण्यात येईल. यामुळे वीजबिलात मोठी बचत होईल.

८४ लाखांचा खर्च

पार्किंगच्या छतावर दोनशे किलोवॉटचे सोलार बसविण्यासाठी ८४ लाख पन्नास हजार ९१४ रुपयांचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे. 'शहर सौंदर्यीकरण नवीन कामे' या लेखाशीर्षांतर्गत या अंदाजपत्रकाला मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे आता सोलार पॅनल बसविण्याचे काम सुरू होऊ शकेल, असे सूत्रांनी सांगितले.

आमच्या बातम्या WhatsApp वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा