कार विहिरीत पडल्याने भीषण अपघात

कार विहिरीत पडल्याने भीषण अपघात

अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेडच्या जामवाडीत  सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास  बोलेरो कार विहिरीत पडल्याची  दुर्दैवी घटना घडली आहे. कठडा किंवा पायऱ्या नसलेल्या एका विहिरीत हे वाहन कोसळल्याने चारचाकी वाहनातील 4 जणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर जामवाडी गावावर शोककळा पसरली आहे. 
      घटनेची माहित मिळताच स्थानिक ग्रामस्थ व पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर, पाण्यात बुडलेल्यांना विहिरीतून वर काढण्यात आले. मात्र, दुर्दैवाने चारही जणांचा मृत्यू झाला होता. अशोक विठ्ठल शेळके (वय 29) रामहरी गंगाधर शेळके (वय 35), किशोर मोहन पवार (वय 30) आणि चक्रपाणी सुनिल बारस्कर (वय 25) अशी मृत्यूमुखी पडलेल्यांची नावे आहेत.  जामवाडी गावात रस्त्याचे काम चालू असल्याने येथील रस्त्यावर खडी टाकलेली होती. त्यामुळे, वाहनचालकास अंदाज न आल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि कार थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीत पडली. विहीर अतिशय खोल व विहिरीत पाणी असल्याने वाहनातील प्रवाशांना बाहेर पडणे शक्य झाले नाही. त्यामुळे,  पाण्यात बुडून चौघांचाही मृत्यू झाला.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक महेश पाटील आणि सहकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर अग्निशमन दलासही पाचारण करण्यात आले. क्रेनच्या मदतीने व ग्रामस्थांच्या सहकाऱ्याने विहिरीतील कार व सर्वांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. पाण्यातून बाहेर काढल्यानंतर सर्वांना रुग्णालयात नेण्यात आले होते, पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. या घटनेने गावावर शोककळा पसरली असून जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे. 

आमच्या बातम्या WhatsApp वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा