अस्पर्श विषयांना आणि नावीन्याला प्राधान्य दिल्याचा आनंद- डॉ.भालचंद्र कानगो

अस्पर्श विषयांना आणि नावीन्याला प्राधान्य दिल्याचा आनंद- डॉ.भालचंद्र कानगो

औरंगाबाद / प्रतिनिधी -  'शासनाचा श्री. पु. भागवत हा पुरस्कार जाहीर झाला त्यावेळी मला कॉम्रेड गोविंद पानसरे यांची प्रकर्षाने आठवण झाली. त्यांनी आपल्या सहकाऱ्यांना घेऊन लोकवाङ्मय गृह चालू ठेवण्याचा निर्धार केला. दरवर्षी लोकवाङ्मय गृहच्या वतीने महाराष्ट्रभर ग्रंथ यात्रा आयोजित केल्या. ज्या पुस्तकांना आणि विषयांना कुणी हात लावू शकत नव्हते असे विषय लोकवाङ्मय गृहने प्रकाशात आणले. लेखकांचा आणि वाचकांचा विश्वास आम्ही संपादन करू शकलो आणि तो वृद्धिंगत करू शकलो याचे समाधान आहे. मोठ्या संघर्षातून, अडचणीतून लोकवाङ्मय गृहचा प्रवास झालेला आहे. नाविन्य आणि वेगळेपण ही लोकवाङ्मय गृहने जपलेली वैशिष्ट्ये यामुळे चर्चेत आली आहे.यासाठी प्रकाश विश्वासराव, सतीश काळसेकर, प्रकाश रेड्डी, राजन बावडेकर, तुकाराम भस्मे आदी मंडळींच्या पुढाकाराने आणि योगदानाने ही संस्था कार्य करत आहे. या पुरस्काराच्या निमित्ताने असा विश्वास आम्ही देऊ शकतो की यापुढेही पुस्तकांच्या माध्यमातून वाचक आणि लेखक यांचा विश्वास दृढ आणखी दृढ करू' असे मत डॉ. भालचंद्र कानगो यांनी व्यक्त केले.

प्रगतिशील लेखक संघातर्फे महाराष्ट्र शासनाचा श्री. पु. भागवत पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल लोकवाङ्मय गृहचे संचालक डॉ. भालचंद्र कानगो यांचा सत्कार करण्यात आला.

शासनाच्या उत्कृष्ट प्रकाशन संस्थेच्या पुरस्कारासह मानाचे पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन आणि सत्कार कॉ.व्ही.डी.देशपांडे सभागृहात आयोजित करण्यात आला होता.लोकवाङ्मय गृहने प्रकाशित केलेल्या उत्तम कांबळे लिखित ‘अस्वस्थ शतकातील माणगाव परिषद’, आणि डॉ.शोभा पाटकर लिखित ‘मना मना, दार उघड’ या पुस्तकांनाही पुरस्कार प्राप्त झाले आहे.यावेळी सत्काराला उत्तर देताना डॉ.भालचंद्र कानगो म्हणाले की , लोकवाङ्मय गृह पुढिल काळातही अशा प्रकारची पुस्तके प्रकाशित करेल.
यावेळी प्रा.जयदेव डोळे यांनी अभिनंदनपर मनोगत व्यक्त करताना लोकवाङ्मय गृहशी लेखक म्हणून निर्माण झालेले नाते विशद केले.
प्रगतिशील लेखक संघाचे सचिव डॉ.समाधान इंगळे यांनी प्रास्ताविक केले. याप्रसंगी पत्रकार व्यंकटेश केसरी, भीमराव बनसोड, प्रा. पंडित मुंढे,  ॲड. अभय टाकसाळ, गुलाबराव मगर, राधाकृष्ण मुळी, सुनीता मुंगीकर, प्रकाश बनसोड, कथाकार उत्तम बावस्कर, कवयित्री आशा डांगे, कवयित्री रुपाली पाटील, कवयित्री ज्योती सोनवणे, उमेश इंगळे आदी उपस्थित होते.

आमच्या बातम्या WhatsApp वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा