खा. इम्तियाज जलिल यांचा पकंजा मुंडे यांना सल्ला

खा.  इम्तियाज जलिल यांचा पकंजा मुंडे यांना सल्ला

औरंगाबाद / प्रतिनिधी -  भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी स्वतःचा पक्ष काढावा मी त्यांना पाठिंबा देईन असे मोठं विधान खासदार इम्तियाज जलिल  यांनी केले आहे.
पंकजा मुंडेंनी पक्ष काढल्यास राजकारणात भूकंप येईल असेही जलिल म्हणाले. पंकजांना एक वेगळ भविष्य असून, त्यांच्या नावापुढे गोपीनाथ मुंडे यांचं नाव असून, गोपीनाथ मुंडेंना मानणारा खूप मोठा वर्ग आजही महाराष्ट्रात असल्याचे जलिल म्हणाले. एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीदरम्यान जलिल यांनी वरील विधान केलं आहे. त्यांच्या या विधानानंतर राजकीय तर्कवितर्कांना उधाण आले आहे. 

ज्यावेळी गोपीनाथ मुंडे राज्याचे गृहमंत्री होते. त्यावेळी त्यांनी वंजारी समाजासाठी केलेलं काम कुणीही विसरलेले नाही. त्यामुळे विधान परिषदेत उमेदवारी न दिल्याने केवळ नाराजी व्यक्त करण्याऐवजी पंकजा मुंडेंनी दुसऱ्याच दिवशी पक्षाला रामराम ठोकायला पाहिजे होता आणि वेगळ्या पक्षाची घोषणा करायला पाहिजे होती, असेही जलिल यांनी म्हटले आहे. पंकजा ज्यावेळी ओबीसीच्या नेत्या म्हणून उभ्या राहतील त्यावेळी त्यांच्या पाठीमागे किती मोठी ताकद उभी असेल याचं खरं चित्र पाहण्यास मिळेल असेही ते म्हणाले. 

दरम्यान, वेगळा पक्ष काढण्याबाबत तुम्ही कधी पंकजा यांच्याशी चर्चा केली आहे का? असा प्रश्न जलिल यांना विचारला असता ते म्हणाले की, पंकजा यांची बहीण प्रितम मुंडे खासदार असून, त्यांना या प्रस्तावाबाबत सुचवले आहे. जर, पंकजा यांनी वेगळा पक्ष काढण्याचा निर्णय घेतल्यास महाराष्ट्रात एक मोठा राजकीय भूकंप येऊ शकतो. तसेच मुंडे परिवाराची ताकद महाराष्ट्रात काय आहे हे सर्वांना कळू शकेल. 

भविष्यात जर पंकजांनी स्वतःचा पक्ष स्थापन केल्यास एमआयएमला जवळचं म्हणून एक तर मुस्लिम समाज, दलित समाज किंवा ओबीसी समाज आहे. त्यामुळे असं काही घडल्यास नक्कीच पंकजा मुंडे यांना पाठिंबा देईल असेही जलिल यांनी यावेळी स्पष्ट केले. एवढेच नव्हे तर, भविष्यात ओबीसी आणि मुस्लिम समाज एकत्र आल्यावर महाराष्ट्रात काय नाही करू शकणार असेही ते म्हणाले. 

दरम्यान, जलिल यांच्या या विधानामुळे राजकीय तज्ज्ञांच्या भुवया उंचावल्या असून, विधान परिषदेचं तिकीट नाकारल्यामुळे खरंच पंकजा मुंडे स्वतःचा पक्ष काढणार का? किंवा त्यांच्या मनात नेमकं काय आहे हे येत्या काळात पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. मात्र, जलील यांच्या वरील विधानामुळे विविध चर्चांना उधाण आले आहे.

आमच्या बातम्या WhatsApp वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा