धोत्रा संस्थान येथे विकासकामे सुरू करण्याबाबत बैठक
सिल्लोड /प्रतिनिधी - दि.26, श्री. सिद्धेश्वर संस्थान धोत्रा येथे विकास कामे करतांना भाविक भक्तांसाठी पायाभूत सुविधांसह, भव्य सभागृह, धार्मिक विधी पूर्ण करण्यासाठी सोयी सुविधा तसेच येथे नयनमोहक सुशोभीकरण करण्यासाठी प्राधान्याने उपाययोजना हाती घेण्यात याव्या यासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही असे प्रतिपादन महसुल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी धोत्रा येथील गावकऱ्यांच्या बैठकीत केले.
श्री. सिद्धेश्वर संस्थांनच्या विकासासाठी पहिल्या टप्प्यात 2 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. येत्या 3 वर्षात संस्थान ला ' अ ' दर्जा प्राप्त करून देण्यासह येथील संस्थानच्या विकासासाठी टप्याटप्याने 8 कोटी रुपयांचा निधी शासनाकडून मिळवून देऊ अशी ग्वाही देत श्री. सिद्धेश्वर संस्थानचा विकास साधत असतांना गावकऱ्यांनी यात आपला सहभाग नोंदवून सहकार्य करण्याचे आवाहन राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी गावकऱ्यांना केले.
राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या प्रयत्नाने धोत्रा ता. सिल्लोड येथील श्री. सिद्धेश्वर देवस्थानच्या विकासासाठी शासनाने 2 कोटी रुपयांचा निधीला मंजुरी दिली. गेल्या अधिवेशनात उपमुख्यमंत्री अजीज पवार यांनी सभागृहात याबाबत घोषणा केली होती. त्याअनुषंगाने धोत्रा येथे मंदिर परिसरात पहिल्या टप्याच्या कामाला सुरुवात होणार आहे. याबाबत राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या प्रमुख उपस्थितीत येथील स्थळ पाहणी व गावकऱ्यांची बैठक संपन्न झाली. या बैठकीत गावकऱ्यांशी संवाद साधत असतांना राज्यमंत्री अब्दुल सत्तार बोलत होते.
यावेळी जि.प. माजी उपाध्यक्ष केशवराव तायडे, शिवसेना तालुकाप्रमुख देविदास लोखंड, उपनगराध्यक्ष अब्दुल समीर, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अर्जुन पा. गाढे, नगरसेवक विठ्ठल सपकाळ, सुधाकर पाटील, पंचायत समिती सदस्य शेख सलीम, जि.प. बांधकाम विभागाचे प्रभारी कार्यकारी अभियंता कल्याण भोसले, विस्तार अधिकारी पी.बी. दौड,कंत्राटदार अशोक देशमुख आदींसह शिवना येथील राजू बाबा काळे, पालोदचे सरपंच नासेर पठाण, उपसरपंच मॅचिंद्र पालोदकर, विजय खाजेकर, सुनील लांडगे, धोत्रा येथील जीवनसिंग जाधव, हरसिंग जाधव, श्री. सिद्धेश्वर संस्थानचे सांडूसिंग जाधव, आर.डी. जाधव, विठ्ठल जाधव, ज्ञानेश्वर जाधव, धनराज जाधव, नारायण जाधव, राजेंद्र जाधव, ईश्वर जाधव आदी गावकऱ्यांची उपस्थिती होती.
शिर्डी येथील साईबाबा तसेच शेगाव येथील गजानन महाराज व धोत्रा येथील सिद्धेश्वर महाराज हे राज्यातील समकालीन संत होऊन गेले. मात्र शेगाव व शिर्डी संस्थानच्या तुलनेत धोत्रा संस्थानचा विकास होऊ शकला नाही याबाबत खंत व्यक्त करीत सिद्धेश्वर संस्थांनच्या विकासासाठी मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे , उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सकारात्मक भूमिका घेत पहिल्या टप्यात 2 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी आभार व्यक्त केले. या कामाला लवकरच सुरुवात करण्यात येणार असून येथील सर्वांगीण विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही असे राज्यमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले.
श्री. सिद्धेश्वर संस्थांनचा विकास साधतांना राज्यासह परराज्यातील विकसित देवस्थानचा अभ्यास करून यासाठी अनुभवी अभियंत्यांचा सल्ला व मार्गदर्शन घेण्यात यावे असे निर्देश राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिले.