करोडी येथे वृद्धेचा खून फोन उचलत नसल्याने उघडकीस आली घटना
वाळूज / प्रतिनिधी - करोडी येथे एका ६२ वर्षीय वृद्धेचा तिच्या घरातच अज्ञातांनी काहीतरी जड वस्तू डोक्यावर मारून खून केल्याची घटना गुरुवार दि. १६ डिसेंबर रोजी सकाळी उघडकीस आली. बायडाबाई गोविंद नरवडे ( ६२ रा. पिंपळगाव ता. जि. जालना ह. मु. गट क्रमांक ७०, करोडी ता. जि. औरंगाबाद )असे खून झालेल्या वृद्धेचे नाव आहे.
दौलताबाद पोलीस स्टेशन हद्दीतील करोडी शिवारातील गट नंबर ७० मध्ये राहात असलेल्या बायडाबाई हे गेल्या दोन ते तीन दिवसांपासून फोन का उचलत नाही. याची शहानिशा करण्यासाठी बायडाबाई यांच्या सुनेने गुरुवारी घराजवळील देवचंद राजपूत यांना फोन केला होता. यामुळे देवचंद हे सकाळी नऊच्या सुमारास बायडाबाई यांच्या घरी गेले असता त्यांना बायडाबाई या घरात रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या दिसून आल्या. त्यानंतर देवचंद यांनी घटनेची माहिती पोलिसांनी दिली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर दौलताबाद पोलीस ठाण्याच्या निरीक्षक राजश्री आडे यांनी घटनास्थळी धाव घेतली. वृद्धेचा खून झाल्याची खात्री झाल्यानंतर पो.नि. आडे यांनी या घटनेची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली. त्यानंतर पोलीस उपायुक्त अपर्णा गीते, सहाय्यक पोलीस आयुक्त विवेक सराफ, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश आघाव यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली. यावेळी श्वान पथकालाही पाचारण करण्यात आले होते. श्वान पथकातील श्वान स्विटीच्या मदतीने पथकातील कर्मचारी बी.एल. हरणे, पी. जी. जवळकर, एस. आर. पवार यांनी वृद्धेच्या मारेकरचा शोध घेतला असता स्वीटीने पूर्वे कडे काही अंतरावर मारेकर्याचा माग काढत ती सचिन नरवडे यांच्या घराजवळ घुटमळली. दरम्यान फॉरेसिंक विभागाच्या पथकाने घटनास्थळावरुन हाताचे ठ्ठसे व रक्ताचे नमुने जमा केले. त्यानंतर वृद्धेचा मृतदेह शवविच्छदनेसाठी घाटी दवाखान्यात नेण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान मयत बायडाबाई यांना दोन मुले असून वर्षभरापुर्वी त्यांचा मोठा मुलगा मछिंद्र याचे निधन झाले आहे. तर लहान मुलगा पंडित हा उसतोडीच्या कामासाठी बाहेरगावी गेला असल्यामुळे बायडाबाई या गेल्या वर्षभरापासून औरंगाबाद येथे मुलगी अनुसयाबाई हिच्याकडे राहत होत्या. दरम्यान ११ डिसेंबर रोजी मुलाचे वर्ष श्राद्ध असल्यामुळे त्या करोडी येथील गट क्रमांक ७० मधील त्यांच्या घरी पाच ते सहा दिवसांपूर्वी आल्या होत्या, अशी माहितीही यावेळी पोलिसांनी दिली.