अवैध देशी दारू विक्रीसाठी वापरली नवी शक्कल
निलंगा / प्रतिनिधी - अवैध व्यवसाय करणारे नेहमीच नवीन शकला लढवत असतात त्यातूनच निलंगा येथून शासनाच्या बसमध्ये बसून अवैध देशिदारू चक्क मौजे कोतल शिवणीत आण्याचा अजबच प्रकार नुकताच उघडकीस आला आहे.
काही व्यक्ती अवैध रित्या गावांत देशिदारू आणून विक्री करण्यासाठी थेट निलंगा येथून अवैध देशिदारूच्या बाटल्या चार पिशव्यात घालुन चक्क शासनाच्या बसमध्ये मौजे कोतल शिवणी गावांत खुलेआम दारू चढत्या भावात विक्री करायचे.
गावकऱ्यांनाही कळताच त्यांनी त्यांना रंगेहात पकडण्याचे ठरवले. त्यानुसार गावकऱ्यांनी गावांत बस दाखल होताच नरसिंग शिंदे, नरहरी जोगदंड, निळकंठ हँगरगे,ज्योतिराम शेळके, विजयकुमार वाघमारे या अवैध देशी दारू विक्रेत्यांना देशिदारूच्या बाटल्या पिशवीसह रंगेहाथ पकडून पोलिसांना माहिती दिली.निलंगा पोलिसांना माहिती कळताच सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रताप गरजे, पोलिस कर्मचारी सुनिल पाटील तातडीने घटनास्थळी दाखल होत आरोपींच्या मुसक्या आवळल्या. पाच आरोपींना अटक करून निलंगा पोलिस ठाण्यात त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निलंगा पोलिसांनी तात्काळ कारवाई केल्याने कोतल शिवणी गावांतील महिला व युवकांनी त्यांचं अभिनंदन केले आहे.