जळालेले कचरा प्रक्रिया केंद्र नव्याने उभारून एका महिन्यात सुरू करण्याचे आदेश
औरंगाबाद / प्रतिनिधी - 20 जून सोमवारी लागलेल्या आगीत जळालेल्या हर्सुल येथील महानगरपालिकेच्या सुक्या कचऱ्यावर प्रक्रिया करणाऱ्या प्रकल्पाचे शेड व मशनरी नव्याने उभारून कचरा प्रक्रिया केंद्र एका महिन्यात सुरू करण्याचे तसेच चिकलठाणा येथील घनकचरा प्रक्रिया प्रकल्पात एप्रिल महिन्यांत आग लागून शेडसह मशीनरीचे काही प्रमाणात नुकसान झाले त्याचे ही उर्वरित काम सात दिवसात पूर्ण करून प्रक्रिया केंद्र सुरू करण्याचे आदेश महापालिका आयुक्त तथा प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय यांनी मंगळवारी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.दरम्यान चिकलठाणा येथील घनकचरा प्रक्रिया प्रकल्पाची पाहणी करत असताना तेरा सीसीटीव्ही कॅमेरे पैकी दोन कॅमेरे बंद असल्याचे आढळून आल्याने तेथील ठेकेदाराला दोन लाख रुपये दंड लावण्याचा आदेश दिला.
महानगरपालिकेच्या हर्सुल येथील सुक्या कचऱ्यावर प्रक्रिया करणाऱ्या केंद्राला सोमवारी आग लागून झालेल्या नुकसानीची पाहणी महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय यांनी मंगळवारी केली. यावेळी त्यांनी इलेक्ट्रॉनिक केबल, इलेक्ट्रॉनिक मीटर, सीसीटीव्ही कॅमेरे, जळालेल्या शेड व बेलिंग मशीन,कन्वेअर बेल्ट,फोर क्लेप मशीनची पाहणी करून या जळीत प्रकरणाचा आढावा घेतला. आग कशामुळे लागली याची चौकशी करण्याच्या सूचना दिल्या .
या सुका कचरा प्रक्रिया केंद्राच्या शेड व मशनरीची नव्याने उभारणी करून कचरा प्रक्रिया केंद्र एका महिन्यात सुरू करण्याचे आदेश मनपा शहर अभियंता यांना दिले.तसेच हर्सुल येथील दिडशे मॅट्रिक टन क्षमतेच्या प्रकल्पाची पाहणी करून तेथे फायर सेफ्टी (अग्नी सुरक्षा) यंत्र उभारण्याच्या सूचना दिल्या.या प्रकल्पाची पाहणी केल्यानंतर चिकलठाणा येथील घनकचरा प्रक्रिया प्रकल्पाला भेट देऊन पाहणी केली. एप्रिल मध्ये या प्रकल्पात आग लागून शेडचे व बेलिंग मशीन,प्री शाॅर्टटींग मशीन,श्रेडर मशीन,प्रोसेसिंग मशीन यांचे काही प्रमाणात नुकसान झाले याची पाहणी करून या केंद्राचे काम सात दिवसात पूर्ण करून प्रक्रिया केंद्र सुरू करण्याचे आदेश दिले.
या घनकचरा प्रकल्पाची पाहणी करत असताना सीसीटीव्ही कॅमेऱ्याचीही पाहणी केली.यावेळी तेरा कॅमेऱ्यात पैकी दोन कॅमेरे बंद असल्याचे आढळून आल्याने तेथील ठेकेदाराला दोन लाख रुपये दंड लावण्याचा आदेश महापालिका आयुक्त तथा प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय यांनी दिले. यावेळी शहर अभियंता एस. डी. पानझडे, घनकचरा व्यवस्थापन विभाग प्रमुख तथा उपायुक्त सोमनाथ जाधव, स्वच्छता निरीक्षक विशाल खरात आदी उपस्थित होते.