पर्यावरणाचे संवर्धन करणे ही सर्वांची जबाबदारी - डॉ. सचिन मोरे
संभाजीनगर / प्रतिनिधी - भारतासारख्या बहुसंख्य लोकसंख्या असणाऱ्या देशात पर्यावरणाचा -हास मोठ्या प्रमाणात होत असून पर्यावरणाचे संवर्धन करणे ही आपली सर्वांची जबाबदारी असल्याचे प्रतिपादन पाथरी येथील राजर्षी शाहू महाविद्यालयातील भूगोल विभागप्रमुख डॉ. सचिन मोरे यांनी केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाच्या सहकार्याने मिलिंद कला महाविद्यालयात आयोजित पर्यावरण जागृती कार्यशाळेत डॉ. सचिन मोरे बोलत होते. या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. वैशाली प्रधान होत्या. मंचावर उपप्राचार्य डॉ. संतोष बुरकुल व अंतर्गत हमी कक्षाचे समन्वयक डॉ. फेरोज पठाण यांची प्रमुख उपस्थिती होती.
आपल्या भाषणात बोलताना पुढे डॉ. सचिन मोरे म्हणाले की, कार्बन उत्सर्जनाच्या बाबतीत भारताचा जगात तिसरा क्रमांक लागतो. कार्बन उत्सर्जनामुळे पर्यावरण मोठ्या प्रमाणात दुषीत होत आहे. औद्योगिक क्षेत्रातील कारखान्यामुळेही मोठ्या प्रमाणात वायू प्रदुषण व जल प्रदुषणाची समस्या वाढली आहे. या वाढत्या पर्यावरणीय बदलाचा मानवी जीवनावर मोठ्या प्रमाणावर गंभीर परिणाम होत असून यापासून वाचण्यासाठी वृक्ष लागवड करणे अत्यंत गरजेचे असल्याचे सांगितले.
अध्यक्षीय समारोपात प्राचार्या डॉ. वैशाली प्रधान यांनी आपल्या व आपल्या पुढच्या येणाऱ्या पिढीसाठी पर्यावरणाचे संवर्धन करणे गरजेचे असल्याचे सांगितले. आरंभी कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपप्राचार्य डॉ. संतोष बुरकुल यांनी केले. सुत्रसंचालन डॉ. वनमाला तडवी यांनी तर आभार प्रदर्शन डॉ. संतोष साहाने यांनी केले. या कार्यशाळेसाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.