रुक्मिणीदेवी ऑटिझम फाउंडेशनमध्ये जागतिक स्वमग्नता दिन उत्साहात साजरा

रुक्मिणीदेवी ऑटिझम फाउंडेशनमध्ये जागतिक स्वमग्नता दिन उत्साहात साजरा

औरंगाबाद/ प्रतिनिधी : येथील रुक्मिणीदेवी ऑटिझम फाउंडेशन आणि एमजीएम वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी रुक्मिणीदेवी ऑटिझमच्या सभागृहात जागतिक स्वमग्नता दिन उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी एमजीएम विद्यापीठाच्या मानसशास्र विभागप्रमुख तथा समुपदेशन केंद्राच्या संचालक प्रा. डॉ. सुरेखा मराठे यांचे व्याख्यान झाले.

यावेळी स्वमग्नतेविषयी बोलताना त्या म्हणाल्या, स्वमग्नता हा आजार नसून ती एक अवस्था आहे. ज्यामध्ये मुले संवेदना एकत्रितपणे ग्रहण करून प्रतिसाद देऊ शकत नाहीत. त्यामुळे समाजाचा सामान्य घटक म्हणून जगताना त्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागते. मात्र, समाजानेही त्यांना समजून घेत त्यांच्याची आपुलकीचे वर्तन ठेवल्यास त्यांचे आयुष्य निश्चितच सुकर झाल्याशिवाय राहणार नाही. याप्रसंगी आनुवंशिक आजारतज्ञ डॉ. सुवर्णा मगर यांनीही मार्गदर्शन केले. डॉ. मगर याप्रसंगी म्हणाल्या, समाजात करुणा रुजणे अपेक्षित आहे. त्यामुळे स्वमग्न मुलांना त्यांचे जगणे मुक्तपणे जगता येईल. अध्यक्षस्थानी सायकॅट्री व पेडियाट्रिक विभागप्रमुख डॉ. माधुरी इंगडे होत्या. प्रमुख अतिथी म्हणून एमजीएम विद्यापीठाचे कुलपती अंकुशराव कदम तसेच विश्वस्त प्राचार्य प्रतापराव बोराडे यांची उपस्थिती होती. 

कार्यक्रमाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते आकाशात फुगे सोडून मुक्तीचा संदेश देत अनोख्या पद्धतीने करण्यात आले. प्रास्ताविक रुक्मिणीदेवी ऑटिझम फाउंडेशनच्या संचालक डॉ. रश्मी आचमारे यांनी केले. अशी करुणा असलेली माणसे विरळच असतात. सूत्रसंचालन मराठी विभागातील प्रा. डॉ. राम गायकवाड यांनी, तर आभार इंग्रजी विभागातील प्रा. डॉ. नामदेव सूर्यवंशी यांनी मानले.

आमच्या बातम्या WhatsApp वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा