तिरुपती बालाजी च्या मंदिरात चेंगराचेंगरी

दक्षिण भारतातील प्रसिद्ध तिरुपती बालाजीच्या मंदिरात  वैकुंठ द्वार दर्शनासाठी मिळणाऱ्या टोकन वरून पोलीस व भाविकांमध्ये वाद झाला. गर्दी अतिशय जास्त असल्यामुळे चेंगराचेंगरी झाली. त्यामध्ये  6 लोकांचा मृत्यू होऊन 50 लोक जखमी झाल्याची दुर्दैवी घटना  विष्णू निवास आणि रामानायडू स्कूल परिसरात  घडली.
रुग्णांना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. टोकन घेण्यासाठी मोठ्या संख्येने भाविक जमले असताना ही चेंगराचेंगरीची घटना घडली. काही भाविकांनी पोलिसांसोबत हुज्जत घातली, पोलिसांनी समजावूनही धक्काबुक्की सुरू केली. त्यानंतर एका पोलिसाने लाठीचा धाक दाखवला, त्यानंतर भाविकांनी पोलिसांना ढकलून पुढे जायला सुरुवात केली.
मृतकांमध्ये पाच महिलांचा समावेश असून त्यांची ओळख पटली आहे. जखमी भाविकांना जवळच्या रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. त्यामध्ये रुया रुग्णालयात 20 व व्यंकटेश्वर इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस मध्ये 9 रुग्णांना भरती करण्यात आले आहे.
स्थानीक पोलिसांनी सांगितले की, टोकन वितरित करणाऱ्या एका कर्मचाऱ्याची तब्येत अचानक खराब झाल्याने त्याला दवाखान्यात नेण्यासाठी दरवाजे उघडण्यात आले त्यावेळेस भाविकांना टोकन मिळणार आहे त्यामुळेच दरवाजे उघडले असा गैरसमज झाल्याने ही घटना घडली.
तिरुमला तिरुपती मंदिराचे कार्यकारी अधिकारी श्यामला राव यांनी सांगितले आहे की घटनेची गंभीरता पाहता आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू उद्या स्वतः मंदिराला भेट देणार आहेत.
मुख्यमंत्र्यांनी चेंगराचेंगरीच्या घटनेवर तीव्र दुःख व्यक्त केले आहे. आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्री कार्यालयाने सांगितले की, "मुख्यमंत्र्यांनी या घटनेत जखमी झालेल्यांना देण्यात येणाऱ्या उपचारांबद्दल अधिकाऱ्यांशी फोनवरून चर्चा केली आहे. मुख्यमंत्री वेळोवेळी जिल्हा आणि टीटीडी अधिकाऱ्यांशी बोलून सद्य परिस्थितीची माहिती घेत आहेत. मुख्यमंत्र्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना घटनास्थळी भेट देण्याचे आदेश दिले आहेत.

आमच्या बातम्या WhatsApp वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा