भांगसीमाता गडावर वृक्षलागवड व संवर्धन नागरिकांना सहभागी होण्याचे आवाहन
औरंगाबाद / प्रतिनिधी - जल, वृक्ष संवर्धन, पर्यावरण रक्षणाचे काम मागील चार वर्षांपासून टेकडी पर्यावरण ग्रुपच्यावतीने भांगसीमाता गडावर करण्यात येत आहे. उन्हाची तीव्रता लक्षात घेऊन, आगामी काळात येथील वृक्षरोपांना मुबलक पाणी मिळावे यासाठी गडावरील भागात नैसर्गिक पाण्याचे स्त्रोत स्वच्छ करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. यासाठी वृक्ष, पर्यावरण प्रेमी, जल संवर्धनात कार्य करणाऱ्या संस्थांनी श्रमदानासाठी पुढे यावे, असे आवाहन टेकडी ग्रुपने केले आहे. या आवाहनाला औरंगाबादकरांचा उत्सफूर्त प्रतिसाद मिळत आहे.
ओसबॉर्न’चे शिरीष तांबे व त्यांचे सहकारी, ‘औरंगाबाद प्लॉगर्स’चे निखील खंडेलवाल, मयंक खंडेलवाल, वैष्णवी खंडेलवाल, यश इंगळे, तुषार महाजन, मदन ठोंबरे, शाश्वत पर्यटनाची चळवळ चालवणारे आकाश ढुमणे, मराठवाडा प्राचीन वास्तू संवर्धन समितीचे श्रीकांत उमरीकर, औरंगाबाद कनेक्ट टीमचे सारंग टाकळकर, शिवचैतन्य महाजन, सामाजिक विचार मंचचे दत्ता वाकडे, नेमिनाथ खरबडे, व्यंकटी टेकाडे, टेकडी पर्यावरण ग्रुपचे डॉ. श्याम टरके, कैलास चव्हाण, विष्णू सोमासे आदींसह पर्यावरणप्रेमींनी गडावरील नैसर्गिक जलस्त्रोताच्या पुनर्जीवनासाठी आज सकाळी श्रमदान केले. पाण्याच्या टाक्यातील गाळ काढण्यात आला. वृक्षरोपांना पाणी देण्यात आले. श्रमदानानंतर गडाच्या पायथ्याशी उमरीकर, टाकळकर, ढुमने, खंडेलवाल यांच्याहस्ते वृक्षारोपन करण्यात आले. यावेळी महामंडलेश्वर स्वामी परमानंद गिरी यांची विशेष उपस्थिती होती.
उन्हाळ्याची तीव्रता पाहता लावलेल्या रोपांना पाणी देणे आवश्यक आहे. गडावर साचलेल्या मागील वर्षीच्या पाण्याची स्वच्छता, त्या पाण्याचा आगामी काळात वृक्षरोपांसाठी वापर या कामासाठी वृक्ष प्रेमी, पर्यावरण प्रेमी, जलसंर्वधनात काम करणाऱ्या संस्थांनी पुढाकार घेऊन टेकडी पर्यावरण ग्रुपच्या या मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहन ग्रुपचे अध्यक्ष रूपचंद अग्रवाल (मो. क्र.8975706057) यांनी केले आहे. श्रमदान करणाऱ्या संस्था, नागरिकांचे महामंडलेश्वर स्वामी परमानंद गिरी यांनी आभार मानले.
रविवारीही होणार श्रमदान
हिरवागार भांगसीमाता गड, सुरक्षित व ऑक्सिजन हब करण्याचा संकल्प टेकडी पर्यावरण ग्रुपचा आहे. वृक्ष, पर्यावरण प्रेमी, जल संर्वधनात काम करणाऱ्या संस्थांनी टेकडी पर्यावरण ग्रुपच्या या वृक्ष लागृवड, जलसंवर्धन कामात पुढाकार घ्यावा, तसेच भांगसीमाता गडावर उद्या, रविवार (ता.15) श्रमदानासाठी यावे, असे आवाहन अग्रवाल यांनी केले आहे.