केंद्रीय स्वास्थ्य आणि परिवार कल्याण मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांच्या हस्ते स्वास्थ केंद्राचे उद्घाटन
छत्रपती संभाजीनगर /प्रतिनिधी - देशात सर्वोत्तम आरोग्य सुविधा देण्यासाठी केंद्र शासन कटिबध्द असून केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माध्यमातून गावा गावात या सुविधा पोहचविण्याचे उद्दिष्ट असल्याचे प्रतिपादन केंद्रीय स्वास्थ्य आणि परिवार कल्याण मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी आज केले.
जीएसटी भवन येथे केंद्रीय स्वास्थ्य आणि परिवार कल्याण मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांच्या हस्ते स्वास्थ केंद्राचे ऑनलाईन उद्घाटन झाले. यावेळी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार, वित्त राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, सहकार मंत्री अतुल सावे, खासदार इम्तियाज जलील आदी उपस्थित होते.
स्वास्थ केंद्रामुळे मिळणाऱ्या आरोग्य सुविधाबाबत आनंद होतोय असे सांगून डॉ. मांडविया म्हणाले, केंद्र सरकार देशातील प्रत्येक गावात दर्जेदार आरोग्य सुविधा देण्यासाठी सातत्याने काम करते आहे. सहजतेने उपलब्ध होणाऱ्या चांगल्या आरोग्य सुविधा देण्याचे शासनाचे उद्दिष्ट आहे. छत्रपती संभाजीनगर व कोईमतूर येथे स्वास्थ केंद्राची सुरूवात झाल्याने या परिसरातील केंद्रीय कर्मचाऱ्यांना या सुविधा मिळणार आहेत. कर्मचाऱ्यांच्या कल्याणासाठी हे स्वास्थ केंद्र महत्वपूर्ण ठरेल. निरोगी भारतीय हेच देशाचे भवितव्य असल्याचेही त्यांनी सांगितले.
स्वास्थ केंद्रामुळे कर्मचाऱ्यांना दर्जेदार आरोग्य सेवा मिळणार- वित्त राज्यमंत्री डॉ.भागवत कराड
वित्त राज्यमंत्री डॉ.भागवत कराड म्हणाले, छत्रपती संभाजीनगर हे एक औद्योगिक शहर तसेच मराठवाडयाची राजधानी आहे. मराठवाडयाच्या या राजधानीलगत 18 ते 20 हजार केंद्रिय कर्मचारी आहेत. या कर्मचा-यांची गेल्या अनेक वर्षापासूनची या स्वास्थ केंद्राची मागणी आज पुर्ण होतेय, ही निश्चितच आनंदाची बाब आहे. स्वास्थ केंद्रामुळे केंद्रीय कार्यरत व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना दर्जेदार आरोग्य सेवा मिळणार आहेत.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली देशाने प्रत्येक क्षेत्रासह आरोग्य क्षेत्रातही उल्लेखनीय प्रगती केली आहे. कोरोना कालावधीत आपल्या देशात दर्जेदार आरोग्य सुविधा दिल्या गेल्या. लसीकरणातही देशाने चांगली कामगिरी केली आहे. आरोग्य क्षेत्रातील अनेक नवनवीन उपकरणांचाही पुरवठा गतीने करून कोरोनावर आपण मात केली आहे.
केंद्र शासनाच्या आयुष्यमान भारत योजनेतून पाच लाखापर्यंत विमा कवच देण्यात आपले असून याचाही लाभ सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. देशातील प्रत्येक जिल्हयात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला असून उद्योग, शेती क्षेत्रासोबतच आरोग्य क्षेत्रासाठीही अर्थसंकल्पात निधीची भरीव तरतूद करण्यात आल्याचेही डॉ. कराड म्हणाले.
यावेळी केंद्रिय विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी सेवानिवत्त कर्मचारी उपस्थित होते.