शिवभक्तांचा विजय प्रशासनाची माघार
औरंगाबाद /प्रतिनिधी - काल मध्यरात्री मनपाने शिवजयंतीचे बॅनर काढल्याने चांगलाच वाद पेटला.याप्रकरणीच मनसेचे जिल्हाध्यक्ष सुमित खांबेकर यांनी मनपा अधिकाऱ्यांना जाब विचारला असता, अधिकाऱ्यांनी तिथून काढता पाय घेतला. याप्रकरणीच महापालिका आयुक्त अस्तिककुमार पांडे यांनी महत्वपूर्ण भूमिका घेतली असून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे उद्घाटन आता १२ ऐवजी १० वाजता होणार आहे. अशी माहिती आयुक्त अस्तिककुमार पांडे यांनी दिली आहे.
शहरातील क्रांती चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण शुक्रवारी होणार आहे. मात्र अनावरनाची वेळ मध्यरात्री १२ वाजताची ठेवण्यात आली होती. त्यामुळे सुप्रिम कोर्टाच्या निर्देशानुसार रात्री १२ वाजेनंतर ढोलताशे व इतर ध्वनिक्षेपकांवर बंदी आहे. मग १२ वाजता राजेंचे आगमन शांततेत कसे पार पडणार? असा सवाल शिवप्रेमींनी उपस्थित केला. त्यात नवीन वाद म्हणजे काल मध्यरात्री शिवजयंतीचे बॅनर काढल्याने चांगलाच वाद पेटला.
तसेच या कार्यक्रमाला सर्वपक्षीय नेत्यांना निमंत्रित केले जाणार आहे. तर बॅनरमुळे झालेल्या वादावर तोडगा म्हणून बॅनर लावण्यासाठी महापालिका शिवप्रेमींना जागा उपलब्ध करून देणार आहे. दरम्यान या तोडग्यावर शिवप्रेमींनी समाधान व्यक्त केले आहे
मनपाने शिवजयंतीचे बॅनर हटवल्यानंतर आक्रमक शिवप्रेमींपुढे औरंगाबाद प्रशासनाने अखेर माघार घेतली आहे.