सिल्लोड शहरात हर घर दस्तक अभियान
सिल्लोड /प्रतिनिधी - शासनाच्या 'हर घर दस्तक' अभियान अंतर्गत सिल्लोड शहरात कोरोना प्रतिबंधक लसीकणास सुरुवात झाली आहे. उपविभागीय अधिकारी संजय मोरे यांच्याहस्ते या अभियानाचे उदघाटन गुरुवारी संपन्न झाले. यावेळी नगराध्यक्षा राजश्री निकम तसेच उपनगराध्यक्ष अब्दुल समीर यांची प्रमुख उपस्थिती होती. या अभियानात शहरातील सर्व शाळांनी सहभागी होवून शाळेतील विद्यार्थ्यांनी शहरात फेरी काढून कोरोना लसीकरणा बाबद जनजागृती केली.
यावेळी पोलीस निरीक्षक रामेश्वर रेंगे, डॉ. मॅचिंद्र पाखरे, नायब तहसीलदार प्रभाकर गवळी, नॅशनल सुत गिरणीचे संचालक राजेंद्र ठोंबरे, रुग्ण कल्याण समितीच्या सदस्या दीपाली भवर, नगरसेवक सत्तार हुसेन, आसेफ बागवान, राजू गौर, मुख्याधिकारी सय्यद रफिक, अकिल देशमुख, उपजिल्हा रुग्णालयाचे वैदयकीय अधिकारी डॉ. मोरे, डॉ. मुद्दसिर, डॉ. फेरोज पठाण, हाजी राजू देशमुख आदींची उपस्थिती होती.
कोरोनाच्या तिसऱ्या लाटे पासून सुरक्षित राहण्यासाठी प्रत्येकाचे कोरोना लसीकरण होणे गरजेचे आहे. ' हर घर दस्तक ' या अभियानांतर्गत महसुल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या मार्गदर्शनाखाली सिल्लोड मध्ये पुन्हा लसीकणास सुरुवात झाली आहे. ज्यांना कोरोना लस घेण्यासाठी लसीकरण केंद्रावर येण्यास अडचणी असतील अशा नागरिकांना आता घरी येवून लसीकरण करण्यात येणार आहे. ही एक सुवर्ण संधी असून कोरोना पासून सुरक्षित राहण्यासाठी शंभर टक्के लसीकरण करणे हे आपल्या सर्वांची जबाबदारी असल्याचे स्पष्ट करीत शंभर टक्के लसीकरण करण्यासाठी नागरिकांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन उपनगराध्यक्ष अब्दुल समीर यांनी केले.
नो लस.. नो पेट्रोल , गॅसची सिल्लोड मध्ये होणार अंमलबजावणी
100 टक्के लसीकरण होण्यासाठी शासनाच्या वतीने उपाययोजना करण्यात येत असून या संदर्भात काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहे. यानुसार ज्यांनी लस घेतली नाही त्यांना शासनाच्या कोणत्याच लाभाच्या योजनेचा लाभ घेता येणार नाही. लस न घेतलेल्या नागरिकांना यापुढे रेशन तसेच पेट्रोल व गॅस मिळणार नाही यासाठी आदेश जारी करण्यात आले असून याची सुरुवात देखील झाली आहे अशी माहिती याप्रसंगी उपविभागीय अधिकारी संजय मोरे यांनी दिली. त्यामुळे होणारी गैरसोय टाळावी व प्रत्येकाने कोरोनाची लस घ्यावी असे आवाहन देखील उपविभागीय अधिकारी संजय मोरे यांनी नागरिकांना केले आहे.
हर घर दस्तक कोरोना लसीकरण अभियान अंतर्गत शहरात एकूण 6 बूथ करण्यात आले आहेत. शहरातील जामा मस्जिद ( छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ) परिसर, रहेमानिया मस्जित समोर, बालाजी हॉस्पिटलजवळ, शिक्षक कॉलनी भागातील सिद्धेश्वर महाराज चौक, टिळक नगर भागातील कालिंका माता मंदिर, औरंगाबाद नाका परिसरातील चर्च परिसर या भागात 6 बूथ करण्यात आले असून या माध्यमातून संपूर्ण शहरात 100 टक्के लसीकरणाचे उद्दिष्ट नगर परिषद तसेच शासकीय यंत्रणेच्या वतीने करण्यात आले आहे.