राज्य शासन राबवित असलेले लोकोपयोगी कामे घराघरात पोहचवा - आमदार डॉ. मनीषा कायंदे
औरंगाबाद/ प्रतिनिधी - महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकारने अनेक लोकोपयोगी कामे केली आहे. कोरोनाच्या संकटात नागरिकांना धीर देत विकासकामांचा धडाका सुरू आहेत. त्यामुळे राज्य सरकारची लोकोपयोगी कामे घराघरात पोहचवा,असे आवाहन शिवसेना आमदार तथा महिला आघाडीच्या संपर्कप्रमुख डॉ. मनीषा कायंदे यांनी केली.
शिवसेना महिला आघाडीच्या वतीने रविवारी हॉटेल विट्स येथे जिल्हास्तरीय महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी प्रमुख मार्गदर्शक
म्हणून त्या बोलत होत्या.
जिल्ह्यातील विकासासाठी राज्य सरकारने आतापर्यंत २६०० कोटींचा निधी दिला आहे, यापुढे देणार आहे. मी माझ्या स्थानिक विकास निधीतून अनेक भागात मूलभूत सुविधा व विकासकामांसाठी निधी प्राप्त करून दिला. त्यामुळे मतदानरुपी आशीर्वाद नागरिकांनी शिवसेनेला द्यावे, असे डॉ. कायंदे म्हणाल्या. राज्य सरकारने शक्ती कायदा, महिला व बालकल्याणाच्या सशक्तिकरण, महिला आयोगातर्फे मदत केंद्रे, महिला पोलिसांची मदत कक्ष अश्या योजना अंमलात आल्या आहेत. त्यामुळे सर्व कामे व निर्णय शेवटच्या घटकापर्यंत पोहचले पाहिजे, यांची जबाबदारी महिला आघाडी घ्यावी. आपआपसातील हेवेदावे विसरून संघटन मजबूत करण्यासाठी प्रयत्न करा, असे त्यांनी सांगितले.
सध्याचे २०२२ हे वर्ष निवडणूक वर्ष आहे. यावर्षात जिल्ह्यात जिल्हापरिषद, पंचायत समिती, महानगरपालिका आणि सहकारी संस्थांच्या निवडणुका होणार आहे. त्यामुळे शिवसेनेने महिलांना मोठ्या प्रमाणात पदे देऊन काम करण्याची संधी दिली. त्यामुळे महिलांनो मिळालेल्या संधीचे सोनं करा,असे त्या म्हणाल्या.
यावेळी शहर व ग्रामीण भागातील शिवसेना महिला आघाडी पदाधिकारी यांनी मेळाव्यास उस्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी संपर्कसंघटक सुनीता आऊलवार, सहसंपर्कप्रमुख सुनीता देव, जिल्हासंघटक प्रतिभा जगताप, राखी परदेशी, जिल्हा समनव्यक कला ओझा, उपजिल्हासंघटक नलिनी बाहेती, अंजली मांडवकर, मीना फसाटे,जयश्री लुंगारे, विधानसभा संघटक नलिनी महाजन, लक्ष्मी नरहिरे, मीरा देशपांडे, शहरसंघटक प्राजक्ता.राजपूत, विद्या अग्निहोत्री, आशा दातार आदींसह उपशहर संघटक, उपतालुका संघटक, विभागसंघटक, शाखा संघटक उपस्थित होत्या.