किराणा दुकानातून चालवत होता हवाला रॅकेट
औरंगाबाद/ प्रतिनिधी - तांदळाच्या दुकानातून हवाला रॅकेट चालवणाऱ्या एकाचा गुन्हे शाखेने पर्दाफाश केला. शहरातील शहागंजहून चेलीपुऱ्याकडे जाणाऱ्या रस्त्यावरील सुरेश राईस किराणा दुकानात छापा मारून पोलिसांनी ही कारवाई केली.
मंगळवारी संध्याकाळी गुन्हेशाखेने ही कारवाई करत आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती दिली. या ठिकाणाहून तब्बल 1 कोटी साडेनऊ लाख रुपये जप्त करण्यात आले. सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास येथील किराणा व्यापारी आशिष सावजी यांना मशीनने नोटा मोजत असतानाच गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली. सावजी हवाला रॅकेट चालवत असावा, तशा नोंदीही त्याच्याकडे सापडल्या असून पोलीस आता या प्रकरणाच्या मूळापर्यंत जाण्यासाठी तपास करत आहेत.
किराणा सामानाचे मागे नोटांची बंडलं
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहागंज ते चेलीपुरा या रस्त्यावर सुरेश राईस या दुकानात मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार चालत असल्याची माहिती शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानुसार, सहाय्यक पोलीस आयुक्त विशाल ढुमे, पोलीस निरीक्षक अविनाश आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक कल्याण शेळके आणि त्यांच्या पथकाने सुरेश राईस या दुकानाच्या बाहेर दिवसभर रेकी केली. यात अनेकजण काहीही सामान न घेता दुकानातून परतत असल्याचे दिसून आले. त्यानंतर काहीतरी काळंबेरं असल्याची खात्री पटल्यावर पोलीस पथकाने सायंकाळी थेट दुकानावर छापा मारला. अधिक झाडाझडती घेतली असता दुकानाच्या समोरील भागात किराणा सामान आणि मागे नोटांची बंडलं रचून ठेवलेली आढळली.
घटनास्थळी दोन डायऱ्या, अनेक नोंदणी
पोलीसांनी घेतलेल्या झाडाझडतीत घटनास्थळी पेन, पेन्सिल, मशीनसह दोन डायऱ्या सापडल्या. 30 नोव्हेंबर 2021 पासून त्यात नोंदी आहेत. त्यात फार सविस्तर न कळतील अशा नावांसमोर लाखोंच्या नोंदी आढळल्या. आता यात सह्या करणारे नेमके कोण आहेत, याचा तपास पोलीस करतील.
पुढील तपास जीएसटी, आयकर विभाग करणार
सुरेश राईस दुकानात सापडलेल्या पैशाचा हिशेब आयकर विभाग, जीएसटी विभाग करणार आहे. हे पैसे कुठून आले, येथून कुठे जात होते, याविषयी पुढील दोन दिवसात तपास केली जाईल, असे अधिकाऱ्यांच्या वतीने सांगण्यात आले आहे.