भारतीयांनी संविधानशील होणे अधिक आवश्यक - प्रा. श्रीकृष्ण मोरे

संभाजीनगर /प्रतिनिधी - येथील विवेकानंद महाविद्यालयामध्ये भारतीय राज्यघटनेच्या 75 वर्ष पूर्ती निमित्त ' संविधान गौरव महोत्सव' अंतर्गत "नागरी जीवनातील संविधानाचे महत्त्व" या विषयावर माणिकचंद पहाडे विधी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. श्रीकृष्ण मोरे यांचे विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. आर. शेंगुळे असून महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.आर. आर. शिंदे तसेच डॉ. अरुणा पाटील यांची मंचावर विशेष उपस्थिती होती.
आपल्या वक्तव्यात प्रा. मोरे म्हणाले की सार्वजनिक जीवन जगत असताना ते सुरक्षित, सहकारी आणि व्यक्ती विकासाला पूरक करण्याचे मार्ग संविधानाने प्रशस्त केले. विषमता, दारिद्र्य व शोषण असणाऱ्या समाजात स्वातंत्र्य, समता, बंधुत्व आणि न्याय या चतु:सूत्रींच्या आधारावर मानवतावादी मूल्यांची रुजवात करण्याचे कार्य भारतीय संविधानकर्त्यांनी केले. व्यक्तीच्या सदसद्विवेकबुद्धीवर विश्वास ठेऊन दुर्बल, असक्षम तसेच मुख्य प्रवाहाबाहेर फेकल्या गेलेल्या वंचित लोकांनाही त्यांच्या हक्कांची जाणीव करून देण्यासाठी तसेच त्यांचा वापर करण्यासाठी संविधानासारखे पवित्र साधन संविधानाच्या माध्यमातून घटनाकारांनी सर्वसामान्य नागरिकांना उपलब्ध करून दिले. या संविधानाने भारतीय नागरिकांना केवळ प्रतिष्ठापूर्वक जगण्याचाच नाही तर प्रतिष्ठापूर्वक मृत्यू स्वीकारण्यासाठी अधिकार देऊ केलेला आहे. रक्तरहीत क्रांतीच्या माध्यमातून भारतीय समाज व्यवस्थेत आणि मानसिकतेमध्ये प्रचंड परिवर्तन करण्याची क्षमता भारतीय संविधानात असल्याचेही प्रा.मोरे यांनी प्रतिपादित केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. दत्ता लावंड तर आभार प्रदर्शन कार्यक्रमाचे समन्वयक तथा राज्यशास्त्र विभागप्रमुख डॉ. राजेंद्र शेजुळ यांनी केले. व्याख्यानासाठी विद्यार्थी, पालक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.