अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून प्रियकराने पळवले 12 तोळ्याचे दागिने
औरंगाबाद / प्रतिनिधी : मुंबईतील १६ वर्षांच्या अल्पवयीन मुलीस शहरातील युवकाने प्रेमाच्या जाळ्यात ओढले. गावाकडे लग्न असल्याचे सांगून प्रेयसीला तिच्या आईची एक सोन्याची पोत मागितली. तिनेही प्रेमासाठी तत्काळ होकार दिला. त्यानंतर कपाटातील १२ तोळे सोने पाहून डोळे फिरले आणि त्याने सोन्याची पिशवी घेतली आणि पसार झाला. तब्बल आठ महिन्यांनी प्रियकरास औरंगाबाद गुन्हे शाखेच्या पथकाने बेड्या ठोकल्या आहेत.खेच्या पथकाने बेड्या ठोकल्या आहेत.
प्रफुल्ल रमेश जगताप (२१, रा. माऊलीनगर, बीड बायपास) असे आरोपी प्रियकराचे नाव आहे. प्रफुल्ल मुंबईतील गोवंडी भागातील इमारतीमध्ये राहत होता. ऑगस्ट २०२१ मध्ये त्याने प्रेयसीला आपल्या घरी कार्यक्रम असल्याचे सांगितले. तिच्या आईची एक सोन्याची पोत आपल्या आईला घालण्यासाठी देण्याची मागणी केली. तिने कपाट उघडले. १२ वर्षांच्या लहान भावासमोरच तिने एक पोत देण्यासाठी पिशवी काढली. त्यात १२ तोळे सोन्याचे दागिने होते. ते पाहून प्रफुल्लने प्रेयसीला धक्का देत तिच्या हातातून सोन्याची पिशवी हिसकावून पळ काढला. मुलीच्या आईला काही दिवसांनी सोने कपाटात दिसले नाही. त्यामुळे मुलांना विचारपूस केल्यानंतर या प्रकाराचा भंडाफोड झाला.
या प्रकरणी शिवाजीनगर, मुंबई पोलीस ठाण्यात प्रफुल्लच्या विरोधात गुन्हा नोंद झाला. प्रफुल्ल सापडत नव्हता. गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक कल्याण शेळके यांना तो बीड बायपास परिसरात फिरत असल्याची माहिती मिळाली. त्यावरून शेळके, सहायक फाैजदार रमाकांत पटारे, हवालदार विजय निकम, राजेंद्र साळुंके, संदीप सानप, नितीन देशमुख यांच्या पथकाने सापळा रचून त्यास अटक केली. आरोपीने कबुली दिल्यानंतर त्यास मुंबई पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.