पुणे- सातारा महामार्गावर  भीषण अपघात

पुणे- सातारा महामार्गावर  भीषण अपघात

पुणे/ प्रतिनिधी - पुणे- सातारा महामार्गावर  भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. कंटेनर आणि बसच्या विचित्र अपघातामध्ये चौघांचा जागीच मृत्यू झाला आहे. या अपघातामध्ये 23 प्रवासी जखमी झाले आहेत. हा अपघात सातारा जिल्ह्यातल्या वरवे गावाच्या हद्दीत झाला.

अपघातानंतर महामार्गावरील मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. या अपघाताचा तपास सातारा पोलिसांकडून  सुरु आहे.   मिळालेल्यामाहितीनुसार,सातारा महामार्गावर वरवे गावाच्या हद्दीत रविवारी दुपारी हा अपघात झाला. या अपघातामध्ये 4 वाहनं एकमेकांना धडकली. या वाहनांमध्ये 2 कंटेनर आणि 2 बसचा समावेश आहे. अपघातानंतर खासगी बस पलटी होऊन 4 जणांचा जागीच मृत्यू झाला. तर 23 प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींमध्ये 4 जणांची प्रकृती गंभीर आहे. अपघातामध्ये जखमी झालेल्या प्रवाशांवर नजीकच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या अपघातातील मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.   अपघातग्रस्त वाहनं पुण्याहून साताऱ्याच्या दिशेने जात असताना हा अपघात झाला. अपघातानंतर पोलीस आणि स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरु केले. जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर अपघातात मृत्यू झालेल्यांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. अपघातानंतर या मार्गावरची वाहतूक विस्कळीत झाली आहे. अपघातग्रस्त वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. महामार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरुवातीला बसला कंटेनरने पाठीमागून जोरदार धडक दिली. या धडकेनंतर बस महामार्गावर उलटली. त्यामुळे बसमधील चार प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. तर 23 प्रवासी जखमी झाले. जखमी प्रवाशांमध्ये चौघांची प्रकृती गंभीर आहे. या अपघातावेळीच एका कारने देखील कंटेनरला पाठीमागून धडक दिली. यामध्ये कारचे नुकसान झाले पण कारमधील प्रवासी सुखरुप आहेत. अपघातानंतर महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. पोलिसांकडून वाहतूक कोंडी सोडवण्याचा प्रयत्न सुरु आहे.

आमच्या बातम्या WhatsApp वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा