तोंडोळी बलात्कार प्रकरणात पोलिसांकडे १८० दिवसाचा अवधी
औरंगाबाद/प्रतिनिधी- तोंडोळी बलात्कार प्रकरणातील सर्व आरोपीवर गुन्ह्याचे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करण्यासाठी पोलिसांना ९० ऐवजी १८० दिवसाचा कालावधी मिळाला आहे. या सर्व आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात येत असल्याने पोलिसांना हा कालावधी मिळाल्याची समजते.
याच प्रकरणातील चार आरोपींनी चिकलठाणा येथे मारहाण करून शेतवस्ती लुटली होती या गुन्ह्यातील मुद्देमाल चिकलठाणा पोलिसांनी त्यांच्याकडून जप्त केला आहे.
कुख्यात प्रभू शामराव पवार या दरोडेखोरांच्या टोळीने 19 ऑक्टोबर रोजी बिडकीन जवळील तोंडोळी शिवारात दोन महिलांवर सामूहिक अत्याचार करून दरोडा टाकला होता. या घटनेची राज्यभरातून निंदा होत होती. पोलिसांनी तपासचक्रे फिरवत सर्वच्या सर्व सात आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. त्यांच्यावर मोक्का कायदाअंतर्गत कारवाई करण्यात आली.सध्या आरोपी न्यायालयीन कोठडीत आहे.मोक्काकायदा लावल्याने न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यासाठी या प्रकरणात ९० ऐवजी आता१८० दिवसाचा वाढीव कालावधी पोलिसांना मिळाला.याचा फायदा देखील पोलिसांना होणार आहे. न्यायालयात कुठलीही पाऊलवाट आरोपिना मिळू नये यासाठी पोलिसांकडून खबरदारी घेतली जात आहे. शिवाय पोलीस अधीक्षक, उप विभागीय अधिकारी या प्रकरणाच्या प्रत्येक घडामोडीकडे वयक्तिक लक्ष घालून आहेत. अनेकांचे संसार उध्वस्त करणाऱ्या या सैतानाच्या टोळीना शिक्षा होण्यास कुठलीही कमी राहता कामा नये, यासाठी साक्षीदार,पंच, परिस्थितीजन्य पुरावे, आरोपींची पार्श्वभूमी यांचा सखोल अभ्यास करण्यात येत आहे.
लुटीचा ऐवज हस्तगत
तोंडोळी प्रकरणातील सात दरोडेखोरापैकी प्रभू शामराव पवार, विजय प्रल्हाद जाधव, सोमीनाथ बाबासाहेब जाधव, ज्ञानेश्वर मुरलीधर जाधव या चार दरोडेखोरांनी १८ ऑक्टोबरच्या मध्यरात्री चिकलठाणा येथील शेतवस्तीवर राहणाऱ्या पती-पत्नीला बेदम मारहाण करून सोन्याचे दागिने,रोख लुटून नेली होती.याचारही आरोपिना चिकलठाणा पोलिसांनी ताब्यात घेत कसून चौकशी केली असता चौघांनी गुन्ह्याची कबुली दिली.त्यांच्या ताब्यातून सोन्याचे मानिमंगळसूत्र व रोख वीस हजार पोलिसांनी जप्त केली आहे.