ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षेचे धडे
संभाजीनगर /प्रतिनिधी - पोलीस स्थापना दिवसाच्या अनुषंगाने छत्रपती संभाजी नगरचे पोलीस अधीक्षक (ग्रामीण ) डॉ. विनय कुमार राठोड यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यातील शालेय विद्यार्थ्यांमध्ये सायबर सुरक्षेसंदर्भात जनजागृती होण्याच्या दृष्टीकोनातुन दिनांक 6 जानेवारी रोजी सकाळी 11 ते 12 वाजेपर्यंत “ सायबर सुरक्षा जिल्हास्तरीय स्पर्धा परिक्षे ” चे आयोजन करण्यात आले आहे.
या स्पर्धा परिक्षेचा मुख्य विषय हा सोशल मिडीया जसे, व्हॉट्सॲप, फेसबुक, इंस्टाग्राम, ऑनलाईन गेम यांच्या माध्यमांतून होणारी फसवणूक, तसेच सोशल मिडीयाच्या सवयी (addiction) इ. वर आधारित आहे.
या माध्यमातून शालेय स्तरावरील विद्यार्थी ,पालक तसेच शिक्षक यांच्यामध्ये जागृती होईल. मुले अशा सायबर धोक्यापासुन वेळीच सावध होतील, कोणत्याही सायबर प्रलोभनास बळी पडणार नाहीत तसेच त्यांच्या अधीन जाउन स्वत:चा जिव धोक्यात घालणार नाहीत.
या स्पर्धा परिक्षेत ग्रामीण जिल्हयातील एकुण 46 शाळेतील 12,250 विद्यार्थी सहभागी होणार आहेत. त विद्यार्थ्यांना विषयाची संपूर्ण माहिती देण्यासाठी शाळेच्या दर्शनी भागावर सायबर जनजागृती संदर्भात बॅनर लावण्यात येणार असुन या बॅनरवर क्युआर कोडच्या माध्यमांतुन सायबर विषयाच्या अनुषंगाने माहिती उपलब्ध करून देण्यात येत आहे. विद्यार्थी अथवा शिक्षक तसेच पालक यांनी सदरचे क्युआरकोड स्कॅन करून संपुर्ण सायबर विषयाचे वाचन विद्यार्थ्यांकडून करून घेणे अत्यावश्यक आहे ज्यामुळे मुलांना सायबर तसेच सोशल मिडीयाचा वापर, त्याद्वारे होणारी फसवणूक व फसवणूकीचे प्रकार याचे अद्यावत ज्ञान होईल, त्या अनुषंगाने ते परिक्षेला सामोरे जातील.
सायबर सुरक्षा जिल्हास्तरीय स्पर्धा परीक्षेमध्ये इयत्ता 8 वी ते 10 वी पर्यंतच्या माध्यमिक विद्यार्थ्यांचा सहभाग असुन त्यांना सायबर विषयावर एकुण 30 बहुपर्यायी प्रश्न हे 30 गुणांकरिता विचारले जाणार आहेत.
यातील प्रथम, द्वितीय, तृतीय असे विद्यार्थ्यांचे गुणवत्तेनुसार गुणांकन करण्यात येणार असुन त्यांना पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून प्रमाणपत्र, ट्रॉफी असे पारितोषिक प्रदान करण्यात येणार आहेत. पोलीस अधीक्षक यांनी पालक, शिक्षक तसेच विद्यार्थ्यांना आवहन केले आहे कि,पोलीस स्थापना दिवस अनुषंगाने आयोजित करण्यात आलेल्या “सायबर सुरक्षा जिल्हास्तरीय स्पर्धा परिक्षे” मध्ये स्वयंस्फुर्तीने सहभागी व्हावे.