शिवरस्ता मोकळा करण्यासाठी आमरण उपोषण
वडगांव ( को ) / प्रतिनिधी- साजापुर शिवरस्ता गेली अनेक वर्षे असून अडचण नसून खोळंबा अशी अवस्था झालेली आहे. यामुळे परिसरातील नागरिकांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन येथील सामाजिक कार्यकर्ते हरिभाऊ बुरंगे यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. अनेकवेळा प्रशासनाकडे दाद मागूनही नागरिकांची होणारी हेळसांड लक्षात घेता सदरील गंभीर समस्येची दखल शिवसेना ( उबाठा) पक्षाचे तालुका प्रमुख बाळासाहेब गायकवाड यांनी तात्काळ आंदोलनस्थळी भेट दिली तसेच सदरील रस्त्याची प्रत्यक्ष पाहणी करत नागरिकांना आश्र्वस्त केले.
यावेळी शिवसेना शहरप्रमुख सागर शिंदे पाटील, उपतालुका प्रमुख विष्णु जाधव पाटील, उपशहर प्रमुख दत्तात्रय वर्पे पाटील, विभाग प्रमुख विनोद दाभाडे, किशोर उगले यांच्यासह आंदोलनाचे मार्गदर्शक माजी पंचायत समिती सभापती सर्जेराव चव्हाण , आप्पासाहेब जाधव, जाफर पटेल, आदिनाथ भूमी, दिगंबर विटेकर, रामप्रसाद शिंदे, दादासाहेब गडगुळे, कैलास पवार, जनार्दन शेजुळ यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी शालेय विद्यार्थी, महिला व नागरिकांनी रस्त्याअभावी हेळसांड होत असल्याची कैफियत तालुका प्रमुख बाळासाहेब गायकवाड यांच्यासमोर मांडत अडचणींचा पाढा वाचला.