मेल्ट्रॉन रुग्णालयात आता बाह्यरुग्ण सेवा सुरू

मेल्ट्रॉन रुग्णालयात आता बाह्यरुग्ण सेवा सुरू

औरंगाबाद /प्रतिनिधी -  कोरोना संसर्ग नियंत्रणात आल्यामुळे चिकलठाणा येथील मेल्ट्रॉन रुग्णालयात आता बाह्यरुग्ण सेवा सुरू झाली आहे. सर्वसामान्य नागरिकांसाठी या ठिकाणी असलेल्या सिटी स्कॅन ब्रेन/चेस्टसाठी ७०० रुपये आणि एक्स-रे डिजीटल-सीआरओडीकरिता १०० रुपये दराप्रमाणे फीस आकारली जाणार आहे. अशी माहिती मनपा आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांनी दिली.


कोरोना संसर्ग आता नियंत्रणाखाली आला असला तरी चौथी लाट येण्याची शक्यता नाकारता येणार नाही. त्यामुळे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने टेस्टींग वाढविण्याचे आदेश दिले आहे. त्यादृष्टीने मनपा प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी तयार करण्यात आलेले चिकलठाणा येथील मेल्ट्रॉन कोविड सेंटरमध्ये  साडेतीनशे बेड, ऑक्सीजनच्या सुविधांसह उपलब्ध आहेत. कोरोना नियंत्रणात आल्यामुळे रुग्णांची संख्या देखील अत्यंत कमी झाली आहे. त्यामुळे मनपा प्रशासक तथा आयुक्त आस्तिककुमार पाण्डेय यांच्या मार्गदर्शनाखाली मेल्ट्रॉन येथील रुग्णालयात बाह्यरुग्ण सेवा आणि छोट्या शस्त्रक्रिया करण्यास सुरूवात केली आहे. मेल्ट्रॉन येथे अत्याधुनिक सिटी स्कॅन मशीन आणि एक्स-रे मशीन बसविण्यात आलेल्या आहेत. सिटी स्कॅनआणि एक्सरे मशीनचा गरीब सामान्य रुग्णांना उपयोग करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार रुग्णांसाठी सिटी स्कॅन ब्रेन/चेस्ट सेवेसाठी ७०० रुपये आणि एक्स-रे डिजीटल सिआरओडी (प्रति एक्स-रे शुट) १०० रुपये दर आकारणी करण्यात आली आहे. नागरिकांनी या सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन मनपा आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांनी केले आहे.

आमच्या बातम्या WhatsApp वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा