छत्रपती संभाजीनगरमध्ये भीषण अपघात
संभाजीनगर / प्रतिनिधी - छत्रपती संभाजीनगरमध्ये ट्रॅक्टरला जीपने पाठीमागून जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला आहे. या भीषण अपघातामध्ये ३ भाविकांचा जागीच मृत्यू झाला तर १२ जण जखमी झाले आहेत.
साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीला जात असताना हा अपघात झाला. जखमी झालेल्या भाविकांना उपचारासाठी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. संभाजीनगर पोलिसांकडून अपघाताचा तपास सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ऊस घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टर ट्रॉलीला जीप धडकून झालेल्या भीषण अपघातात ३ जणांचा मृत्यू झाला. तर १२ जण जखमी झाले आहे. अपघाताची ही घटना गंगापूर-वैजापूर मार्गावर शिल्लेगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत तांबूलगोटा फाटा येथे रात्रीच्या सुमारास घडली. अपघातामध्ये जखमी झालेले आणि मृत्यू झालेले सर्वजण हैदराबाद येथील आहेत. हे सर्वजण देवदर्शनासाठी महाराष्ट्रात आले होते.
या भीषण अपघातामध्ये वैद्विक ऊर्फ नंदन श्यामशेट्टी (६ महिने), अक्षिता गडकुनुरी (२१ वर्षे) आणि प्रेमलता श्यामशेट्टी (५८ वर्षे) या तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर १२ जण जखमी झाले आहे. जखमींमधील अनेकांची प्रकृती गंभीर आहे. जखमींवर नजीकच्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. हैदराबाद येथील १४ भाविक मंगळवारी शिर्डी येथे आले होते.
हे सर्वजण छत्रपती संभाजीनगर येथे आले होते. बुधवारी सकाळी जीपमधून वेरूळ लेण्या पाहून आणि घृष्णेश्वराचे दर्शन घेऊन गंगापूरमार्गे शिर्डीला जात होते. शिर्डीला जात असताना रात्री १० वाजताच्या सुमारास तांबूळगोटा फाटा येथे महालगावकडे ऊस घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीला या भाविकांच्या जीपने पाठीमागून धडक दिली. हा अपघात एवढा भीषण होता की कारचा चक्काचूर झाला.