स्मार्ट सिटी च्या कामांना मिळणार गती अडीचशे कोटी रुपयांचा निधी मंजूर

स्मार्ट सिटी च्या कामांना मिळणार गती अडीचशे कोटी रुपयांचा निधी मंजूर

औरंगाबाद /प्रतिनिधी - स्मार्ट सिटी ची उर्वरित कामे पूर्ण करण्यासाठी  महापालिकेचा अडीचशे कोटी रुपयांचा  कर्जाचा प्रस्ताव सेंट्रल बॅक ऑफ इंडियाने मंजूर केला आहे. यानंतर स्मार्टसिटीच्या कामांना गती  मिळाली असून, गेल्या काही दिवसात विविध प्रकल्पाच्या१७ निविदा काढण्यात आल्या आहेत.

महापालिकेने स्मार्ट सिटीचा हिस्सा भरण्यासाठी २५० कोटी रुपयांचे कर्ज घेण्याची तयारी सुरू केली होती.  कर्जाचा प्रस्ताव नगरविकास विभागाकडे पाठविण्यात आला होता. याला नगरविकास विभागाने अटी व शर्थीच्या आधारे नुकतीच मंजुरी दिली. दरम्यान स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडच्या संचालक मंडळाची सोळावी बैठक पार पडली. यात विविध महत्वपूर्ण प्रकल्पांना मंजूरी मिळाली होती. कर्ज मंजुर झाल्याने या कामांना गती मिळाली आहे. स्मार्ट हेल्थ, स्मार्ट स्कूल, रस्ते, कौशल्य विकास केंद्र, स्ट्रीट डेव्हलपमेंट, सफारी पार्क आदी  मागच्या दहा दिवसात या प्रकल्पांच्या एकूण 17 निविदा स्मार्ट सिटी तर्फे जारी करण्यात आल्या आहेत.

या निविदांमध्ये संत तुकाराम नाट्यगृहासाठी फायरफायटिंग यंत्रणा, मिटमिटा येथे सफारी पार्क साठी  सिमेंट रस्ता, सिडको एन 5 येथील रस्त्यांचा पुनर्विकास, भाडेतत्त्वावर इलेक्ट्रिक बस ऑपरेटरची निवड, मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल चे बांधकाम, कनॉट परिसरात स्ट्रीट ट्रान्सफॉर्मेशन, पैठण गेट ते गुलमंडी चौक मार्गाचा पुनर्विकास, सफारी पार्क येथे इमारतीचे बांधकाम, क्रांती चौक ते गोपाल टी मार्गाचा पुनर्विकास, वेदांतनगर येथील कम्यूनिटी सेंटरचे कौशल्य विकास केंद्र करण्यासाठी रिनोवेशन, नाथ सुपर मार्केटच्या तिसऱ्या मजल्याचे कौशल्य विकास केंद्र करण्यासाठी रिनोवेशन, शहरातील विविध ठिकाणी रस्ते आदींचा समावेश आहे.

आमच्या बातम्या WhatsApp वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा