बुध्दांचे तत्वज्ञान हे जगात सर्वश्रेष्ठ - खा. भदंत अथुरलीये

बुध्दांचे तत्वज्ञान हे जगात सर्वश्रेष्ठ - खा. भदंत अथुरलीये

संभाजीनगर/  प्रतिनिधी - पाली भाषा ही जगातील सर्वात जुनी भाषा असून या भाषेतून बुध्दांनी सांगितलेले तत्वज्ञान हे सर्वश्रेष्ठ तत्वज्ञान आहे. बुध्द तत्वज्ञान सर्वांनी आत्मसात करुन आपले दैनंदिन जीवन जगावे असे प्रतिपादन श्रीलंकेतील खासदार भदंत अथुरलीये रतन थेरो यांनी केले.

मिलिंद महाविद्यालयाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित भाषा विषयांच्या दोन दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राच्या उद्घाटन प्रसंगी खा. भदंत अधुरलीये रतन थेरो बोलत होते. विचारमंचावर दिल्ली येथील जवाहरलाल नेहरु विद्यापीठातील प्रा. डॉ. अजमेर सिंग काजल, भदंत करंबे सुमन, भदंत अहंगामा मैत्रीमुर्ती महाथेरो, भदंत कोथमले दिनघा महाथेरो, भदंत मंगलकंदे धम्मकिथ्थी महाथेरो, भदंत यतीगाला सोमाथीलका महाथेरो, भदंत इलुम्बाकंदे विनिथा महाथेरो, भदंत डॉ. एम. सत्यपाल महाथेरो यांची प्रमुख उपस्थिती होती तर अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. वैशाली प्रधान होत्या.

आपल्या भाषणात बोलताना खा. भदंत अधुरलीये रतन थेरो पुढे म्हणाले की, प्राचीन काळात भारत देशात बुध्द तत्वज्ञानाचा उगम झाला आणि हे तत्वज्ञान सम्राट अशोकाच्या काळात श्रीलंकेत पोहोचले. अलीकडील काळात नव-नवीन विचार प्रवाह येत असून श्रीलंकेत पाली भाषेला समृध्द करण्यासाठी संशोधन केले जात आहे. पाली भाषेच्या अभ्यासातून आत्मीक आनंद व मानसिक समाधान मिळते असे सांगितले.

प्रा.डॉ. अजमेर सिंग काजल आपल्या बीजभाषणात बोलताना म्हणाले की, साहित्य समाजाला दिशा देण्याचे कार्य करते. साहित्याच्या माध्यमातून समाजातील समस्यांचे प्रकटीकरण केले जाते. मध्ययुगीन व स्वातंत्र्य पूर्व काळात शुद्र व मागासवर्गीयांची स्थिती जनावरांपेक्षाही वाईट होती. या सर्व दलित व वंचितांचे चित्रण दलित साहित्यातून विविध साहित्यिकांनी केले, यातूनच दलित साहित्याची निर्मिती झाली व आंबेडकरवादी विचार प्रवाहाचा प्रचार-प्रसार झाला असे सांगितले.

अध्यक्षीय समारोपात प्राचार्या डॉ. वैशाली प्रधान यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मागासलेल्या मराठवाडा विभागासाठी मिलिंद महाविद्यालयाच्या माध्यमातून शिक्षणाची दारे खुली केल्याचे सांगितले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय प्रा. सुजीत गायकवाड यांनी करुन दिला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ. शंकर गवळी यांनी केले तर शेवटी सर्व उपस्थितांचे आभार डॉ. राहूल केंद्रे यांनी मानले. या राष्ट्रीय चर्चासत्रासाठी विविध महाविद्यालयातील प्राध्यापक व संशोधक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आमच्या बातम्या WhatsApp वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा