खेळाच्या मैदानावर मनपाकडून खाजगी बांधकामाला परवानगी
सिडकोने नागरिकांच्या सोयीसाठी आराखड्यात नियोजित केलेल्या जागेवर मनपा सिडकोची परवानगी न घेता खाजगी बांधकामाला परवानगी देत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
एन १३ मधील सर्व्हे नं. ११७ मध्ये अडीच एकर खुले मैदान असून तेथे मनपाने खासगी बांधकामाला परवानगी दिल्याने तेथील बांधकामाची परवानगी रद्द करून ते बांधकाम पाडण्यासाठी सिडको प्रशासनाने पालिकेला पत्र दिल्याची माहिती सिडकोचे मालमत्ता अधिकारी गजानन साटोटे यांनी गुरुवारी दिली.
सिडकोने क्रीडांगणे, खुली मैदाने, ग्रीन बेल्ट नागरिकांच्या सोयीसाठी आराखड्यात नियोजित केले. १३ उद्याने, २६ क्रीडांगणांवर सध्या अतिक्रमण होत असल्याचे दिसत असून मनपानेही बांधकाम परवानगी दिल्याच्या प्रकारामुळे कुुंपणच शेत खात असल्याचे दिसते आहे.
अधिकारी साटोटे म्हणाले, टीव्ही सेंटर मैदानात पालिकेने वॉर्ड कार्यालयाचे बांधकाम केले, त्यासाठी सिडकोकडे काहीही परवानगीची विचारणा केली नाही. तसेच एन-६ येथील मनपाच्या शाळेचीही विनापरवाना तोडफोड केली. ती शाळा सिडकोने बांधलेली आहे. एप्रिल २००६ मध्ये सिडकोतील वसाहतींचे सोयी-सुविधांसाठी मनपाकडे हस्तांतरण झाले. त्यात खुली मैदाने, उद्याने, क्रीडांगणांसाठी एनओसीचे अधिकार सिडकोकडे ठेवून हस्तांतरण झाले. परंतु १८ वर्षांत सिडकोने आरक्षित केलेल्या उद्यान, क्रीडांगण, मैदानांची वाताहत झाल्याचे दिसते आहे. शाळांसाठी जे क्रीडांगण, मैदान राखीव ठेवले आहे. त्यावर सिडकोने एनओसी दिल्याशिवाय भाडेकरार किंवा बांधकाम करण्यास परवानगी देता येत नाही. तसेच ते मैदान इतरांना देता येणार नाही. व्यावसायिक वापर करता येणार नाही, असेही त्यावेळी ठरले होते.
ऑडशेपच्या विक्रीच्या तक्रारी
सिडकोने भूखंड विक्री वेळेस जे करार केले, त्यात भूखंडालगत असलेली ओपन स्पेस (ऑडशेप) बांधकाम करून विक्री अथवा भाडेकरारावर देता येत नाही. विक्री, भाडेकरारावर ती ओपन स्पेस द्यायची असेल तर सिडकोची एनओसी बंधनकारक असेल. तसेच त्या जागेच्या उत्पन्नातून मिळणारी ५० टक्के रक्कम सिडकोला मालकांना द्यावी लागेल. ऑडशेप भाड्याने अथवा विक्रीचे प्रमाण वाढल्याच्या तक्रारी येत आहेत.
सिडको ॲक्शन मोडवर
तेरणा संस्थेने खुल्या मैदानाची, एन : १३ येथील बांधकामाची गुरुवारी सिडको मालमत्ता अधिकारी गजानन साटोटे व पथकाने पाहणी केली. सर्व्हे नं. ११७ मधील एन:१३ येथे मनपाने दिलेली बांधकाम परवानगी रद्द करा, असे पत्र मनपाला दिले आहे. अडीच एकर जागा तेथे आहे. तसेच झालर क्षेत्रातील पाच अनधिकृत बांधकामांवर गुन्हे दाखल केले आहेत. आजवर ३१ अनधिकृत बांधकामांविरोधात सिडकोने कारवाई केली आहे. सहा ठिकाणी अतिक्रमणे पाडली आहेत. अनधिकृत आरसीसी बांधकामे विनापरवाना होत आहेत. हिरापूर, सुंदरवाडी, हिरापूर येथील बांधकामांचा समावेश आहे. मनपाने परवानगी दिल्यानुसार सुरू असलेल्या बांधकामाचे फोटो न्यायालयात ठेवण्यात येतील, असेही सिडकोने सांगितले.